वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

नाशिक - मूळ भारतीय पण कॅनेडियन नागरिकत्व असलेल्या नितीन पाटील यांच्यावर चुकीची कारवाई करत महिनाभर मध्यवर्ती कारागृहात राहावे लागल्याप्रकरणी दोघा पोलिस उपनिरीक्षकांवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे सूतोवाच आयुक्तांनी दिले आहेत. येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक एस. सी. सोनोने, अजिनाथ मोरे या दोघांना गेल्या आठवड्यात निलंबित केले आहे. नितीन वसंत पाटील (रा. गंगापूर रोड) यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असून, मालमत्तेच्या वादातून त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगर येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीने त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले. यात त्यांना तपासी अधिकारी मोरे आणि सोनोने यांनी मदत केल्याचे चौकशीतून समोर आले. पाटील यांच्या मूळ तक्रारीकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांच्या चुकीमध्ये त्यांना महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहावे लागले. याप्रकरणी, न्यायालयीन कोठडीत असतानाच नितीन पाटील यांनी थेट पंतप्रधान कार्यालयासह दूतावास, पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांना पत्र लिहून तक्रार केली होती.
Web Title: nashik news crime on senior police officer