कावनईच्या तलाठ्याला ठार करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

इगतपुरी - कावनई (ता. इगतपुरी) येथील तलाठी सचिन कल्याणकर यांना रात्री भ्रमणध्वनीवरून ठार मारण्याची धमकी देत अर्वाच्च शिवीगाळ करणाऱ्या कचरू काशीनाथ दोंदे याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आज तालुक्‍यातील तलाठ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. आज दिवसभर सर्व तलाठ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. सायंकाळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर सर्व तलाठी बांधवांनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतला.

कावनईचे तलाठी सचिन कल्याणकर यांनी एका शेतजमिनीवर खरेदीखताची फेरफार रजिस्टरला नोंद घेतली होती. या नोंदीवर एका तक्रारदाराने हरकत घेतली. तलाठी कल्याणकर यांनी तक्रार रजिस्टर भरून नायब तहसीलदारांकडे योग्य निर्णयासाठी सुपूर्द केले. नायब तहसीलदारांनी संबंधितांना योग्य संधी देत सुनावणी घेऊन निर्णय दिला. निर्णयाचा अंमल तलाठी कल्याणकर यांनी घेतल्याने दुखावलेल्या कचरू दोंदे याने काल रात्री भ्रमणध्वनीवरून श्री. कल्याणकर यांना ठार मारण्याची धमकी देत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तलाठी कल्याणकर यांनी तातडीने इगतपुरी पोलिस ठाण्यात कचरू दोंदेविरोधात तक्रार दिली. 

या घटनेनंतर तालुक्‍यातील तलाठी आक्रमक झाले. त्यांनी दोंदेचा निषेध करत एकदिवसीय कामबंद आंदोलन करून कामकाज ठप्प केले. यात तलाठी संघटना, मंडल अधिकारी आणि लिपिकवर्गीय संघटना सहभागी झाली. दोंदेवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन  प्रांताधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांनी इगतपुरीचे पोलिस निरीक्षक संजय शुक्‍ला यांना संबंधित दोंदेवर कारवाईचे निर्देश दिले.

तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष दगडू येवले, लक्ष्मण सोनवणे, मंडल अधिकारी नानासाहेब बनसोडे, भगवान काकड, सुभाष गिते, नितीन बाहीकर, श्‍याम बोरसे, सुरेंद्र पालवे, अच्युत भांगे, कैलास आहिरे, सचिन कल्याणकर, सुनील शिवपुजे, संदीप जाधव, सचिन कराटे, चंद्रकला ठाकरे, चारूशीला खिल्लारी, सविता म्हसाळ, एस. डी. कडनोर, सुरेखा कदम, राम तौर, सागर पवार, अशोक गायके, शरद बेंडकुळे, बी. आर. धायतडक, विजय खादे, मंगेश साबळे आदींनी निवेदन दिले.

तलाठ्यांचे सायंकाळनंतर भ्रमणध्वनी बंद
या आंदोलनानंतर तालुक्‍यातील सर्व तलाठ्यांनी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर सायंकाळी पावणेसहानंतर आपले व्यक्तिगत भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. रात्री- बेरात्री दूरध्वनीवरून गैरवर्तणूक करून धमक्‍या देणाऱ्या लोकांमुळे हा निर्णय घेतल्याचे तालुकाध्यक्ष येवले यांनी सांगितले.

Web Title: nashik news crime talathi

टॅग्स