गायीच्या मायेने जखमी वासरू राहिले उभे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

इंदिरानगर - चारचाकी वाहनाने धडक दिल्याने जखमी वासराला मानवी मदतीने नाही, मात्र, मायेच्या ममतेची ऊब मिळाली आणि हे वासरू पुन्हा उभे राहिले. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

इंदिरानगर - चारचाकी वाहनाने धडक दिल्याने जखमी वासराला मानवी मदतीने नाही, मात्र, मायेच्या ममतेची ऊब मिळाली आणि हे वासरू पुन्हा उभे राहिले. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

इंदिरानगरच्या कलानगर चौकातून वडाळा गावाकडे जाणाऱ्या शंभर फुटी रस्त्यावर घरकुलांसमोर चारचाकीने वासराला धडक दिली. धडक देऊन वाहनधारक पसार झाला. कलानगर चौकात गणपतीची आरास करणाऱ्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्याचा क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही. इकडे वासरू जिवाच्या आकांताने हंबरत होते. त्याची माउलीही सैरभैर होत त्याच्या अवतीभवती फेऱ्या मारत होती. एकाने ॲनिमल आवासचे गौरव क्षत्रिय यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. वासराच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. बघ्यांची गर्दी वाढत असताना गायीने वासराला चाटण्यास सुरवात केली. काही मिनिटांनी त्याचे विव्हळणे कमी झाले. आणखी थोड्या वेळानंतर ते उभे राहिले आणि त्या माउलीच्या मागे मार्गस्थ झाले. एवढे सगळे होत असताना धडक देणारा आणि त्यानंतर तोडके प्रयत्न करणारे आणि एक कटाक्ष टाकून तेथून जाणाऱ्या नागरिकांपैकी एकाच्याही संवेदना जागृत झाल्या नाहीत. त्यामुळे मुक्‍या प्राण्यांच्या जिवाचे काहीच मोल नाही का, हा प्रश्‍न मात्र अधोरेखित झाला आहे, हे नक्की.

Web Title: nashik news The cured calf stays with the cows