धरणांचा श्‍वास केव्हा होणार मोकळा

धरणांचा श्‍वास केव्हा होणार मोकळा

नाशिक - राज्यात सुमारे 3238 पाटबंधारे प्रकल्प असून त्यात सरासरी आठ टक्के गाळ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेली काही वर्षे हा चिंतेचा, चिंतनाचा विषय झाल्याने गाळ काढण्यासाठी शासनाने धोरणात बदल केलाय. स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत आहेत. एक ट्रक गाळ काढला, तर एक टॅंकर पाणी वाढते हा साधा हिशेब आहे. हाताला काम, पिण्याला पाणी आणि सिंचनाला हातभार लागेल. त्यामुळे गाळात गुदमरणाऱ्या धरणांचा श्‍वास केव्हा मोकळा होणार याचे उत्तर शोधले जात आहे. 

राज्य शासनाने धरणांतील गाळ कमी करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यासाठी गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ज्या गावात धरण असेल तेथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ शेतापर्यंत वाहून न्यावा. शासन स्वखर्चाने गाळ उपलब्ध करेल. या धरणांची साठवण क्षमता 5.18 लाख घन मीटर आहे. त्यात 5.18 लाख घन मीटर गाळ असल्याचा अंदाज आहे. राज्यात 3,238 मोठी, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्यातील 7,821 दशलक्ष घनमीटर हा मृत, 40,568 जिवंत असा एकूण 48,389 दशलक्ष घनमीटर जलसाठा आहे. यामध्ये अमरावती - 443, कोकण प्रदेश - 175, नागपूर प्रदेश - 384, नाशिक प्रदेश - 556, पुणे प्रदेश 725 आणि मराठवाड्यात 955 प्रकल्प आहेत. 

प्रकल्पांतील सर्वच धरणे ज्या नद्यांवर आहेत तेथील भौगोलीक स्थितीनुसार धरणांत गाळ साठण्याची प्रक्रियेची गती ठरते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती पूर्णता बंद होणे ही नैसर्गिक व जैवविविधतेला बाधक असते. गाळ कसा व कोणत्या पद्धतीने काढावा याचा विचार व पद्धती निश्‍चित केली जाते. विविध सामाजिक संस्था त्यावर काम करीत आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालानुसार सरासरी आठ टक्के गाळ आहे. काही धरणांत हे प्रमाण चाळीस ते पंचेचाळीस टक्के आहे. तापी खोऱ्यातील उपलब्ध माहितीनुसार सर्व संख्या दशलक्ष घनमीटर मध्ये, हतनूर - 255 (37.97 टक्के), गिरणा - 523.55 (10.60 टक्के), मन्याड - 40.27 (10.25 टक्के) बोरी - 25.15 (20.75 टक्के), अनेर - 59.20 (16.77 टक्के), करवंद - 20.73 (11.91 टक्के) गाळ आहे. प्रत्येक नदी खोऱ्यात ही स्थिती भिन्न आहे. जेव्हढा गाळ तेव्हढी साठवण क्षमता कमी होतो. त्यामुळे पाटबंधारे व नियोजनाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनत आहे. 

स्वयंसेवी संस्थांचा दिलासा 
सकाळ रिलीफ फंडतर्फे राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर गेली काही वर्षे गावतळे, नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या "नाम' फाउंडेशनने मराठवाड्यासह विविध भागांत गावतळी, नदीपात्रांचे खोलीकरण केले. श्री श्री रविशंकर यांच्या अनुयायांकडूनही नाशिकला मोठ्या प्रमाणात हे काम झाले. 2015 मध्ये "ग्रीन थंब' संस्थेचे लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने पुण्यातील गणेश मंडळांच्या मदतीने गाळ काढण्याचा उपक्रम राबविला. वेण्णा, उजनी, हूपरगी यांसह मावळ तालुक्‍यातील वीस धरणांतील गाळ काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार व समाजातील जागरुकता दिलासादायक ठरतो आहे. 

"धरणांतील गाळ हा गंभीर प्रश्‍न आहे. त्यासाठी सातत्याने संशोधन, आढावा व उपाययोजना करण्यात येत आहेत. "मेरी' संस्थेच्या अहवालानुसार सध्या राज्यातील प्रकल्पांत सरासरी आठ टक्के गाळ आहे.' 
- संजय बेलसरे, उपसचिव, पाटबंधारे विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com