मलनिस्सारण केंद्र, नैसर्गिक गटारीचे पाणी थेट दारणा नदीच्या पात्रात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक-पुणे महामार्गावरील प्रवेशद्वार समजला जाणारा चेहेडी परिसर महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागाचा झपाट्याने विकास होतो आहे. नाशिक रोड पूर्व भाग आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, या भागात मोकळ्या जागा, जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत, त्यामुळे नागरिकांचा कल चेहेडी परिसराकडे वाढला असल्याने निमशहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

नाशिक-पुणे महामार्गावरील प्रवेशद्वार समजला जाणारा चेहेडी परिसर महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागाचा झपाट्याने विकास होतो आहे. नाशिक रोड पूर्व भाग आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे, या भागात मोकळ्या जागा, जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत, त्यामुळे नागरिकांचा कल चेहेडी परिसराकडे वाढला असल्याने निमशहराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 

दारणा व वालदेवी नदीतीरावरील चेहेडी गाव शहराच्या सर्वांत शेवटी आहे. त्यामुळे महापालिकेने दारणा नदीवर नाशिक रोडला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मिनी बंधारा बांधण्यात आला. पण वालदेवी व दारणा किनाऱ्याजवळून महापालिकेने नाशिक रोड, देवळालीगाव, विहितगाव, वडनेर दुमाला या भागातून गटारीची मोठी पाइपलाइन मलनिसरण केंद्राकडे नेली आहे. त्यामुळे काही चेंबर फुटून त्यातील पाणी, सांडपाणी थेट वालदेवी नदीपात्रात मिसळते. तेच पाणी पुढे दारणा नदीचा संगम होऊन दारणा नदीत मिसळते. नाशिक रोड परिसरातील नैसर्गिक गटारीचे पाणीही या दारणा नदीत सोडण्यात येते. महापालिकेने दारणा नदीकिनारी चेहेडी गावालगत मलनिस्सारण केंद्र सुरू केले आहे. या मलनिस्सारण केंद्रातून गटारीचे पाणी शुद्ध करून ते दारणा नदीपात्रात सोडले जात आहे. आज या मलनिस्सारण केंद्रामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. 

चेहेडी गावात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीगही पडलेले पाहायला मिळतात. घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. कुंड्यांचे प्रमाण वाढले आहे. चेहेडी, चाडेगावसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही. त्यामुळे नागरिकांना किरकोळ सर्दी, ताप आला तरी दोन किलोमीटरवर नाशिक रोडला जावे लागते.

स्मशानभूमीतील साहित्यही गायब
सिन्नर फाटा येथे दवाखाना आहे, पण त्याची दुरवस्था असल्याने खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्यायच नसतो. चेहेडी गावात स्मशानभूमी असून, चार बेडपैकी दोनच बेड चांगले आहेत. दोन बेडचे लोखंडी साहित्य गायब झाले आहे. स्मशानभूमीतील राख वाहून जाण्यासाठी पाण्याची व्यवस्था चांगली नाही, नळ आहेत पण दाबाने पाणी येत नाही. कूपनलिका (बोअरिंग) आहे पण तीही नादुरुस्त आहे. गावालगत सुलभ शौचालये आहेत परंतु काहींचे दरवाजे तुटलेले आहेत. ती दररोज स्वच्छ केली जात नाहीत. नैसर्गिक गटारीत मोठ्या प्रमाणात गाळ व गवत झालेले आहे. त्यांची त्वरित स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे. 

महापालिकेचे मलनिस्सरण केंद्र असून, दोन ठिकाणी पाणी स्वच्छ होण्याची प्रक्रिया होते. पहिल्या केंद्रात साधारण १५ ते १६ दशलक्ष व दुसऱ्या ठिकाणी १४ ते १५ दशलक्ष पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. शुद्धीकरण झालेले पाणी पुन्हा नदीपात्रात सोडले जाते. 

चेहेडी गाव व पंपिंग परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली तर रस्त्यावरील कचऱ्याचे ढिगारे कमी होतील.
- गणपत चव्हाण

चेहेडी गावातील शौचालयात पिण्याचे पाणी वापरले जाते. त्या ठिकाणी कूपनलिका करून तिचे पाणी वापरावे. येथे येणारे नळाचे पिण्याचे पाणी गावासाठी उपयोगी पडेल.
- बाळकृष्ण ताजनपुरे 

दारणा नदीपात्रात सोडण्यात येणारे गटारीचे दूषित पाणी बंद करावे. गोदावरीप्रमाणे दारणा नदी प्रदूषणमुक्त जनजागृती करावी. 
- अण्णासाहेब ताजनपुरे 

मलनिस्सारण केंद्रात नाशिक रोड परिसरातून दूषित पाणी येते. त्यावर प्रक्रिया होऊन ते नदीपात्रात  सोडले जाते.
-विकास लांडगे

चेहेडी गावात महापालिकेचे आरोग्य केंद्र नसल्याने किरकोळ आजारावरील उपचारासाठी नाशिक रोडला जावे लागते. येथे आरोग्य केंद्र होणे आवश्‍यक आहे. 
- नामदेव बोराडे

गावातील व शाळांची स्वच्छतागृहे व शौचालये दररोज स्वच्छ होत नसल्याने दुर्गंधी वाढल्याने शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शाळेजवळील स्वच्छतागृह दररोज स्वच्छ व्हावे.
- सुदाम सातपुते 

Web Title: nashik news Darna river