अंत्यसंस्काराची धावपळ अन्‌ मृत महिला जिवंत

संजय भागवत
सोमवार, 21 मे 2018

सायखेडा - एक महिला रात्री डॉक्‍टरांनी मृत घोषित केली. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेण्यासाठी नाकाला लावलेला व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि प्राण गेलेली महिला प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले. चांदोरीतील एका महिलेबाबत घडलेली ही घटना रविवारी (ता. २०) सर्वांना आश्‍चर्याचा धक्का देऊन गेली. दिवसभर चांदोरीच्या पंचक्रोशीत या घटनेचीच चर्चा सुरू होती. ‘देव तारी त्याला कोण मारी’, हीच म्हण आज प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळली.  

जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांची काकू संध्या सुरेश वनारसे या फुफ्फुसाच्या व्याधीने आजारी असल्याने पंधरा दिवसांपासून नाशिकला खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. परंतु शनिवारी (ता. १९) रात्री त्यांची प्रकृती खालावली. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून डॉक्‍टरांनी रात्री ११.५० ला त्यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. या वार्ताने संपूर्ण वनारसे कुटुंबात शोककळा पसरली. रात्रीची वेळ असल्याने सकाळी अंत्यसंस्कार करायचे ठरले. सगळीकडे नातेवाइकांना फोन, मेसेजद्वारे अंत्यसंस्काराची वेळ कळविण्यात आली. दरम्यानच्या काळात संध्या वनारसे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

रात्रभर चांदोरी येथील वनारसे वस्तीवरील घरी जवळचे नातेवाईक जागेच होते. हॉस्पिटलमध्येही काही जण थांबलेले होते. सकाळी पार्थिव नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी चांदोरी येथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. आता फक्त संध्या वनारसे यांच्या मृतदेहाची प्रतीक्षा होती. इकडे रुग्णालयात रात्रभर जागे असणाऱ्या नातेवाइकांनी पार्थिव ताब्यात देण्यासाठी डॉक्‍टरांची परवानगी मागितली. परिचारिकेने संध्या वनारसे यांच्या नाकाला लावलेले व्हेंटिलेटर काढताच त्यांना वनारसे यांच्या ओठांची हालचाल होताना दिसली. त्यांनी तत्काळ डॉक्‍टरांना बोलावले. डॉक्‍टरांनाही रुग्णाची बरीच हालचाल दिसल्याने तातडीने उपचाराला सुरवात करत पुन्हा ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरू करण्यात आला. इकडे चांदोरीत दोन ते तीन हजारांचा जमाव अंत्यसंस्कारासाठी जमा झालेला होता. त्याच दरम्यान संध्या वनारसे या सुस्थितीत असल्याचा निरोप आला आणि शोकाकुल वातावरण क्षणात दूर होऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्‍चर्याचे तरंग उमटले. वनारसे यांना ४८ तास डॉक्‍टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. गेलेला जीव परत आल्याची बातमी सर्वत्र पसरताच प्रत्येकाच्या तोंडी या घटनेची चर्चा होती.

गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या काकू नाशिकला खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. काल डॉक्‍टरांनी व्हेंटिलेटर काढत त्यांना घरी घेऊन जा, असे सांगितले. त्यांच्या निधनाची माहिती आम्ही सर्वत्र दिली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच काकू जिंवत असल्याचे समजले. हा चमत्कारच म्हणावा लागेल. काकूंना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना. 
- सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य, चांदोरी

Web Title: nashik news dead woman alive in saikheda