दीपककुमार मिणा नऊ महिन्यांत पायउतार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा यांच्या कारनाम्यांची वृत्तमालिका "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामविकासच्या मंदावलेल्या विकासाबद्दल चिंतेचा सूर जिल्हावासीयांमध्ये दाटून आला होता. विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी झाडाझाडती घेतल्यानंतरही मिणा यांच्या कार्यप्रणालीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नव्हती. अखेर सरकारने त्यांना पावणेनऊ महिन्यांतच पायउतार करत त्यांच्या जागी मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. नरेश गिते यांची नेमणूक केली.

पांढरकवडा येथून मिणा यांची जिल्हा परिषदेत बदली झाली होती. सनदी अधिकारी मिळाल्याने ग्रामविकासाचा वेग वाढेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांप्रमाणेच अधिकाऱ्यांना होती; मात्र कामाच्या फायलींना लागणारा विलंब तसेच विकासकामांमधील वाटाघाटीमध्ये ठेकेदारांना चर्चेसाठी बोलवण्याची कार्यपद्धत मिणा यांना घालवण्यास कारणीभूत ठरली. डॉ. गिते हे मूळचे ग्रामविकासातील आहेत. सरकारच्या आदेशाची प्रत मिळताच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे डॉ. गिते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: nashik news deepakkumar mina transfer dr naresh gite