सिडको, सातपूर विभागात  सर्वाधिक डेंगीच्या अळ्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

नाशिक - दोन महिन्यांपासून शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या मलेरिया विभागाने सुरू केलेल्या तपासणीत सातपूर व सिडको विभागात सर्वाधिक डेंगीची उत्पत्ती ठिकाणे आढळली आहेत. सर्वाधिक रुग्णही याच भागात असल्याचे सर्वेक्षणाअंती आढळले. 

नाशिक - दोन महिन्यांपासून शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या मलेरिया विभागाने सुरू केलेल्या तपासणीत सातपूर व सिडको विभागात सर्वाधिक डेंगीची उत्पत्ती ठिकाणे आढळली आहेत. सर्वाधिक रुग्णही याच भागात असल्याचे सर्वेक्षणाअंती आढळले. 

गेल्या आठवड्यापर्यंत डेंगीच्या रुग्णांची संख्या शंभरच्यावर पोचली होती. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत चारशेहून अधिक डेंगीसदृश रुग्ण आढळले. दिवाळीत प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभाग व शासनाच्या मलेरिया विभागाकडून दोनदा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यात सिडको व सातपूर विभागात सर्वाधिक डेंगीच्या अळ्या आढळल्या. या भागात पाणी साठवणूक केली जात असल्याने डेंगीचा प्रादुर्भाव वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. गेल्या आठवड्यात पंचवटी विभागात तीन हजार घरे तपासण्यात आली. तेथे 14 घरांमध्ये डेंगीच्या अळी आढळल्या. नाशिक रोड विभागात 2817 घरे तपासण्यात आली. त्यात 37 घरांमध्ये डेंगीच्या अळ्या आढळल्या. सिडकोत तीन हजार 238 घरे तपासली. त्यात 29 ठिकाणी अळ्या आढळल्या. सातपूर विभागात पाच हजार 151 घरे तपासल्यानंतर 38 ठिकाणी अळ्या आढळल्या. पूर्व विभागात सुमारे साडेपाच हजार घरे तपासली. तेथे 29 ठिकाणी अळ्या आढळल्या. 

सिडकोत एकाच भागात  पन्नासहून अधिक रुग्ण  
सिडकोतील तुळजाभवानी चौक परिसरात पन्नासहून अधिक डेंगी आजाराचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. महापालिकेच्या मलेरिया विभागाने आज दिवसभर पाहणी केली. श्री. मुळे नामक व्यक्तीच्या बांधकाम साइटवरील ड्रममध्ये डेंगीच्या अळी आढळल्या आहेत. दिवाळीपूर्वी बांधकाम कामगार गावाला गेले होते. पण ड्रममधील पाणी फेकले न गेल्याने त्यात डेंगीच्या अळ्या निर्माण झाल्याचा निष्कर्ष आज काढला. 

डेंगी अळ्यांची उत्पत्ती ठिकाणे 
- बांधकामाच्या साइट 
- फ्रीजमागील ट्रे 
- तुळस, झाडे लावलेली भांडे 
- पाण्याच्या टाक्‍या 

Web Title: nashik news dengue