महिलांच्या रुग्णालयावरून फरांदे-गिते वाद टोकाला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

नाशिक - महिलांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यासाठी भाभानगर येथील जागा मिळविण्याचा प्रयत्न आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडून होत असतानाच उपमहापौर प्रथमेश गिते यांनी या भागात पार्किंगचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याची उपसूचना केल्याने आता प्रस्तावित महिला रुग्णालय टाकळी रोडवर स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. उपमहापौरांच्या उपसूचनेमुळे आजी-माजी आमदारांमधील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला गेला आहे.

आमदार फरांदे यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला; परंतु रुग्णालयाचा प्रवास एका जागेवर स्थिर होत नाही. मंजुरी मिळाल्यानंतर शालिमार येथील संदर्भसेवा रुग्णालयाच्या आवारात रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण संसर्ग होण्याची भीती व्यक्त करत रुग्णालय प्रशासनाने विरोध केला होता. त्यानंतर वडाळा येथील एका जागेत रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तत्कालीन नगरसेवक संजय चव्हाण यांनी या प्रस्तावाला विरोध केला. पुन्हा त्याच जागेवर म्हणजे वडाळा येथील जागेवर रुग्णालयाचा प्रस्ताव सादर झाल्यानंतर माजी आमदार वसंत गिते व विद्यमान आमदार देवयानी फरांदे समर्थक नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक बघायला मिळाली. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भाभानगर येथील गायकवाड सभागृहाच्या आवारात रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले. गितेसमर्थक नगरसेवकांनी त्यास विरोध केला. आता उपमहापौर प्रथमेश गिते यांनी आयुक्तांच्या ठरावाला उपसूचना देऊन गायकवाड सभागृहाच्या आवारात रुग्णालय उभारणीला विरोध केला. त्याऐवजी टाकळी रोडवरील आरक्षित जागेवर रुग्णालय उभारण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार मान्यता मिळाल्याचे समजते.

गिते- फरांदे संघर्ष
मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांच्यापूर्वी वसंत गिते या भागाचे प्रतिनिधित्व करत होते. भविष्यात श्री. गिते यांचे याच भागातून निवडणूक लढविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे मध्य विधानसभेच्या जागेसाठी आमदार फरांदे यांचा मोठा अडसर ठरणार आहे. त्यामुळे हाच महत्त्वाचा मुद्दा दोघांच्या संघर्षामधील आहे.

Web Title: nashik news Devyani Farande vasant gite