गॅजेटमुळे बळावतेय विकलांगत्व 

गॅजेटमुळे बळावतेय विकलांगत्व 

नाशिक - घरात दंगामस्ती करणाऱ्या चिमुरड्याच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्याला तुम्ही मोबाईल, टॅब देत असाल, तर सावधान! हाती गॅजेट सोपविण्याच्या याच सवयीतून अनेक चिमुकल्यांना कर्णबधिरपणासारखे विकार जडले आहेत. पालकांकडून आणि पालकांच्या नकळत घरात पडलेला मोबाईल स्वच्छंदपणे वापरणाऱ्या चिमुकल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मोबाईलचा मुलांमधील अतिरेकी वापर थांबवायचा कसा, असा यक्षप्रश्‍नही अनेक पालकांसमोर उभा ठाकला आहे. 

सध्या घरोघरी अल्पवयीन मुले अन्‌ विविध गॅजेट यांची जणू मैत्री वाढतच चालली आहे. दुसरीकडे देशात आणि राज्यात अल्पवयीन मुलांमधील विकलांगत्वाचे प्रमाणही वाढत आहे. रडणाऱ्या चिमुरड्याच्या हातात मोबाईल सोपवणे ही जणू आई- वडिलांची फॅशनच झाली आहे. घरातील कुणाचाही धाक न बाळगता मोबाईल घेऊन मुक्तपणे हात फिरवताना मुले दिसतात. पण, गॅजेटशी चिमुरड्यांची असलेली हीच मैत्री आता धोकादायक वळणावर आली आहे. बदलत्या जीवनशैलीसोबतच टीव्ही, मोबाईल गॅजेटच्या अतिरेकी वापरातून अल्पवयातच कर्णबधिरतेचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांसाठी हाय फ्रिक्वेन्सी इलेक्‍ट्रो मॅग्नेटिक फिल्ड (पीईएमएफ) हे धोकादायक ठरतात. विशेषतः मेंदू व रक्तासाठी तर फारच हानिकारक ठरतात. त्यातून मुलांमध्ये दृष्टिदोष, कर्णबधिरता, डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे जळजळणे आदी विकार वाढीस लागले आहेत. परदेशांतील लहान मुले अध्ययनासाठी मोबाईलचा वापर करतात, तर त्यांच्या तुलनेत भारतात गेम खेळणे आणि चित्र काढणे, ते रंगवणे एवढ्या दोनच गोष्टींसाठी मुले मोबाईलचा जास्त वापर करतात, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. राज्य अपंग कल्याण आयुक्तालयाने तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. 

प्रोत्साहन भत्ता 
राज्य अपंग कल्याण विभाग अशी अल्पवयीन विकलांग चिमुकली मुले शोधणाऱ्या केअर टेकर आणि पालकांसाठी प्रोत्साहान भत्ता म्हणून विशेष आर्थिक मदतीची योजना आणणार आहे. अपंग विकासासाठी केंद्र शासनाकडे एक लाखाची कर्णबधिरांसाठी, तसेच एक लाख मानसिक विकलांसाठी, अशा दोन नव्या योजनांचे प्रस्ताव पाठवले आहेत. त्यात दिव्यांग, तसेच त्यांचे पालक व विशेष शिक्षकांसाठी तरतूद आहे. बालकांमधील विकलांगत्व शोधून देणाऱ्या केअर टेकर आणि पालकांना त्यापोटी दोन हजारांपर्यंत एक ठराविक रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्याचे अपंग कल्याण विभागाच्या विचाराधीन आहे. जन्मजात अपंगत्व लक्षात आणून देणाऱ्या केअर टेकरला प्रोत्साहन भत्ता देतानाच, बालकाच्या उपचारासाठी व मानसिक अपंगत्वाच्या उपचार चाचण्यांसोबत अपंगत्वाच्या उपचाराच्या प्रत्येक थेरपीसाठी 200 रुपये देतानाच, यावर नियंत्रणासाठी तटस्थ संस्थेला 750 रुपये देण्याचे नियोजन आहे. 

अनेक बालकांना जन्मल्यानंतर काही दिवसांपासून हे विकार सुरू होतात; पण दुर्दैवाने ते लक्षातही येत नाहीत. अशा जन्मजात आणि जन्मल्यानंतर अल्पवधीत विकलांग होणाऱ्या बालकांचे प्रमाण एक हजारात दोनपर्यंत वाढत असल्याचे चित्र आहे. 
- नितीन पाटील, आयुक्त, अपंग कल्याण आणि पुनर्वसन विभाग 

एक वर्षाच्या आतील बालकांना दोन मिनिटांपेक्षा जास्त फोनवर बोलूच देऊ नये. जेव्हा फोन कानाजवळ असतो, त्या वेळी निर्माण होणाऱ्या इलेक्‍टो मॅग्नेटिक वेव्हज्‌मुळे कान दुखणे, कमी ऐकू येणे अशा समस्या निर्माण होतात. शाळकरी मुलांना मोबाईल गेममुळे डोळ्यांचे विकार जडतात. 
- डॉ. महेश निकम, कान- नाक- घसातज्ज्ञ 

गॅझेट, बदलती जीवनशैलीही 
मुलांना आई- वडिलांच्या हातातच गॅजेट दिसल्यावर त्याचा वापर ते आपोआप करतात. गॅजेटची सवयच लागल्यामुळे वर्गात मुलांचे लक्ष लागत नाही. या गॅजेटचा परिणाम सर्वच अवयवांवर होतो. 90 टक्के मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मुलांना भूकही लागत नाही. 
- डॉ. नितीन चिताळकर, नाक- कान- घसातज्ज्ञ 

मोबाईलमुळे जडणाऱ्या व्याधी 
- मोबाईलच्या इलेक्‍टो मॅग्नेटिक वेव्हज्‌मुळे ऐकायला कमी येणे 
- कानाला सूज येणे, कान दुखणे 
- मोबाईलच्या स्क्रीनकडे सारखे पाहण्यामुळे डोळ्यांना सूज येणे 
- कमी दिसणे, चष्मा लागणे 
- मोबाईल गेमच्या आक्रमक मूव्हमुळे दडपण येणे, चक्कर येणे, मळमळणे 
- सतत वाकून मोबाईलकडे पाहण्यामुळे पाठदुखीचा त्रास होणे 

भारतीय मुले चार तास वापरतात मोबाईल 
भारतात तरुणाई- शाळकरी मुलांचे मोबाईल वापराचे प्रमाण 40 टक्के आहे. परदेशी मुलांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. परदेशांत अंदाजे साठ टक्‍क्‍यांहून अधिक वापर मुले अभ्यासासाठी करतात. भविष्यात भारतातही हे प्रमाण वाढेल. भारतात चित्रपट पाहणे, गेम खेळणे यासाठीच मोबाईलचा वापर होतो. चोवीस तासांमध्ये अमेरिकेतील मुले मोबाईलचा वापर पाच तास करतात, तर भारतातील मुले चार तास मोबाईल वापरतात, असे आढळून आले आहे. 

मोबाईल वापरात भारत चौथा 
मोबाईल सोसायटी रिसर्च इन्स्टिट्यूटने मोबाईलच्या वापरासंदर्भात जगभरातील साडेचार हजार मुले आणि त्यांच्या पालकांशी बोलून सर्वेक्षण केले. त्यानुसार, मोबाईलचा वापर करणाऱ्या मुलांपैकी 42 टक्के मुले स्मार्टफोनचा वापर करतात. इतकेच नाही, तर 54 टक्के मुले मोबाईलवरील नेट वापरतात. आश्‍चर्य म्हणजे पालकांच्या तुलनेत मोबाईलवरील ऍप डाउनलोड करण्यात मुले चार पावले (78 टक्के) पुढेच आहेत. मोबाईलचा वापर करणाऱ्या देशांतील इजिप्तमधील मुलांचा पहिला क्रमांक (96 टक्‍के) आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर चिली असून तेथील 90.7 टक्के मुले मोबाईल वापरतात. तिसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया (77.6) आहे. तर, या यादीत भारताचा क्रमांक चौथा असून, भारतामधील 58.3 टक्के मुले मोबाईल वापरतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com