‘घट घट में पंछी बोलत है’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

नाशिक - ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘विठ्ठल आमुचे जीवन’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ अशी गाणी सादर करत तसेच अहिर भैरव, अहलिया बिलावल यांसारख्या रागात सादर केलेल्या विविध रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पहाटेची गुलाबी थंडी, दीपावलीचे मंगलमय वातावरण त्यात रंगमंचावर सादर होणाऱ्या विविध रचना यामुळे रसिकांना वेगळी अनुभूती मिळाली. निमित्त होते, नसती उठाठेव मंडळातर्फे गौरी पाठारे यांच्या सूरमयी मैफलीचे. 

नरसिंहनगर, गंगापूर रोड येथील हनुमान मंदिरात नसती उठाठेव मित्र मंडळातर्फे दर वर्षीप्रमाणे ‘दीपावली पहाट’ हा कार्यक्रम झाला. यात जयपूर, किराणा व ग्वाल्हेर घराण्याच्या ख्यातनाम गायिका गौरी पाठारे यांची मैफल झाली. मंडळाचे अध्यक्ष बापू कोतवाल यांनी स्वागत केले. गौरी पाठारे यांनी अहिर भैरव रागात ‘मेरो जिया सुख’ हा एकतालातील विलंबित ख्याल सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यानंतर द्रुत तालात ‘अलबेला सजन आयो रे’, तर अलहिया बिलावल रागात ‘कौन बदरिया’ हे तीन तालात सादर केले. द्रुत तीन तालात तराना, ‘घट घट मे पंछी बोलत है’ ही वीणा सहस्त्रबुद्धे यांनी अजरामर केलेली संत कबीर यांची रचना सादर केली. मैफलीच्या उत्तरार्धात गौरी पाठारे यांनी नाट्यसंगीत सादर केले. त्यात पंडित जितेंद्र अभिषेकी यांची रचना ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘हरी भजनाविण वेळ काळ घालवू नको रे, ‘विठ्ठल आमुचे जीवन’ हे सादर केल्यानंतर ‘का रे ऐसी माया...वैकुंठीच्या राया’ या भैरवीने मैफलीचा समारोप करण्यात आला.   

गौरी पाठारे यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), ज्ञानेश्‍वर सोनवणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली.  सुनील आहिरे, सचिन आहिरे, सचिन काटकर, प्रशांत काटकर, प्रवीण काळे, दिलीप कुलकर्णी, सुनील पोफळे, अरुण कुलकर्णी, रवींद्र जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news diwali