लंबोदर अव्हॅन्यूच्या रणरागिणींचे डॉ. सुभाष भामरेंना साकडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नाशिक -तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हॅन्यूमधील रहिवाशांचा विरोध असूनही दारू दुकान सुरू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रणरागिणींनी आज केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना साकडे घातले. तसेच बाटली आडवी करण्याचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार महिलांनी केला.

नाशिक -तिडके कॉलनीतील लंबोदर अव्हॅन्यूमधील रहिवाशांचा विरोध असूनही दारू दुकान सुरू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात रणरागिणींनी आज केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना साकडे घातले. तसेच बाटली आडवी करण्याचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार महिलांनी केला.

डॉ. प्रशांत पाटील यांनी महिलांची डॉ. भामरे यांच्याशी भेट घालून दिली. या वेळी स्थानिकांकडून होणारा विरोध दुर्लक्षित करून प्रशासन अपार्टमेंटमध्ये दारू दुकान सुरू करण्याच्या हट्टाला पेटल्याची तक्रार महिलांनी केली. त्यानंतर डॉ. भामरे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून दारू दुकानास होत असलेल्या विरोधाकडे माझे लक्ष असल्याचे सांगून स्थानिकांचा विरोध वाढणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना दिली. या वेळी अधिकाऱ्यांनी आमच्या अगोदर दारू दुकानाचा निर्णय झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. भामरे यांनी दारू दुकान सुरू होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्याचेही उपस्थितांनी सांगितले. 

कायदेशीर मार्गाची केली पूर्तता
अपार्टमेंट नोंदणीतील कलमाचे उल्लंघन केल्याप्रमाणे दारू दुकानाच्या मालकाच्या साथीदाराने केलेल्या अरेरावीविरोधात रहिवाशांनी मुंबई नाका पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत पोलिस काय भूमिका घेताहेत, याची माहिती घेत असताना कायदेशीर मार्गाची पूर्तता महिलांनी करून ठेवली आहे. ज्येष्ठ विधीज्ञांचा सल्ला घेऊन कागदपत्रे तयार ठेवली आहेत. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सुनावणीची आम्हाला प्रतीक्षा असून, जिल्हा प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास आमच्यासाठी न्यायालयाखेरीज पर्याय उरणार नाही, असे महिलांनी म्हटले आहे. त्याचवेळी सनदशीर मार्गाने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय अपार्टमेंटमधील महिलांच्या झालेल्या बैठकीत झाला आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर बाटली आडवी करण्याचे आंदोलन गाजणार, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

Web Title: nashik news dr subhash bhamre