ई-कचरा कलेक्‍शन सेंटर सहा विभागांत उभारणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नाशिक - शहराचा विस्तार वाढत असताना घनकचरा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. महापालिकेने घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली आहे. परंतु वाढत्या ई-कचऱ्याची समस्याही भेडसावत आहे. त्यातून भविष्यात दुर्घटना घडू नये, यासाठी ई-वेस्ट कलेक्‍शन सेंटर सुरू करून त्यातून प्राप्त झालेल्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची विल्हेवाट लावली जाणार आहे.

सध्या शहरात रोज साडेचारशे टन कचरा संकलित केला जातो. त्याव्यतिरिक्त फ्रीज, बंद पडलेले टीव्ही, संगणक मॉनिटर, की-बोर्ड, सीपीयू, कॅमेरे, मिक्‍सर आदी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू बाहेर पडतात. यापूर्वी सेंकड हॅण्ड वस्तू विकल्या जात होत्या. कालांतराने सहज व स्वस्तात इलेक्‍ट्रॉनिक वस्तू मिळू लागल्या व अनेकांची क्रयशक्ती वाढल्याने खरेदीचेही प्रमाण वाढले. त्या वस्तू खराब झाल्यानंतर भंगारात विकल्या जातात किंवा फेकून दिल्या जातात. फेकून दिल्यानंतर त्या वस्तूंवर हवामानामुळे रासायनिक प्रक्रिया होते. तसेच वेगळ्या प्रकारचे वायू बाहेर पडून त्यातून पर्यावरणाला हानी पोचत असल्याने केंद्र सरकारनेच अशा वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी कायदा केला आहे. ई-वेस्ट व्यवस्थापन कायद्यानुसार महापालिकेनेही ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील सहाही विभागांत कलेक्‍शन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमा झालेला ई-कचरा कचरा डेपोमध्येच जमा केला जाणार असून, त्यातून प्राप्त झालेल्या वस्तू पुन्हा पुरवठादार, विक्रेत्यांना पुनर्वापरासाठी दिल्या जाणार आहेत. महापालिकेला कायद्यानुसार वस्तू पुनर्वापरासाठी पाठविणे बंधनकारक आहे. 

खासगी संस्थांकडून प्रस्ताव मागविणार
महापालिकेकडे स्वतंत्र कचरा संकलनाची व्यवस्था असली तरी ई-कचरा विल्हेवाटीसाठी वेगळी यंत्रणा उभी केली जाणार आहे. अधिकृत पुनर्वापर करणाऱ्या तसेच विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेमार्फत कलेक्‍शन सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे.

Web Title: nashik news e garbage collection center