यंदा गणेशोत्सवात इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर वाढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नाशिक - गणेशोत्सव आता अवघ्या दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. व्यापक जनजागृतीमुळे यंदा गणेशोत्सवात इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तीपासून ते डेकोरेशनपर्यंत इकोफ्रेंडली करण्यावर सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती बसविणाऱ्यांकडे कल दिसून येत आहे.

नाशिक - गणेशोत्सव आता अवघ्या दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपला आहे. व्यापक जनजागृतीमुळे यंदा गणेशोत्सवात इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तीपासून ते डेकोरेशनपर्यंत इकोफ्रेंडली करण्यावर सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती बसविणाऱ्यांकडे कल दिसून येत आहे.

घरगुती मखर विक्रीस
गणेशोत्सवात सजावटीसाठी घरगुती व सार्वजनिक मंडळात थर्माकोलचा मोठा वापर होतो. थर्माकोलचे विघटन होत नसल्याने ते पर्यावरणास मोठी हानी पोचविते. त्यामुळे पर्यावरणप्रेमींचा थर्माकोलचे मखर घेण्यास विरोध असतो, हीच गरज ओळखून अनेक विक्रेत्यांनी यंदा प्लायवूडपासून बनविलेले मखर विक्रीस ठेवले आहे. त्यास चांगला प्रतिसाद असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

विविध वस्तूंपासून गणेशमूर्ती
अनेक जण टाकाऊ वस्तूंपासून गणेशाची मूर्ती बनवितात. काही जण फळे, विविध वस्तूंपासून गणपतीची मूर्ती बनवितात. मध्यंतरी पंचवटीतील एका मंडळाने नारळापासून बनविलेला सोळा फुटी गणपतीचा देखावा शहरभर चर्चेचा विषय ठरला होता. काही जण कागदाच्या लगद्यापासूनही गणपती बनवितात.

नागरिकांचे प्रबोधन
शाडूवर कलाकुसर करण्यात काही प्रमाणात मर्यादा येत असल्याने बाजारात पीओपीपासून बनविलेल्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागल्या. पीओपीपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात सहजासहजी विरघळत नाहीत. त्यांना दिलेले रासायनिक रंग पाण्यात मिसळून मोठे प्रदूषण होते. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून शाडूच्या मूर्तीचा आग्रह धरला जातो. पर्यावरणाचे भान जपत फक्त शाडूच्या मूर्ती बनवून त्या विक्री करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करूनही काही जण पीओपीच्या मूर्तींचाच आग्रह धरतात. असे असले, तरी अनेक ग्राहक शाडूच्या मूर्ती घेण्यासाठी येत असल्याचे सकारात्मक चित्रही दिसून येते.

प्रदूषणाचे जागतिक परिणाम एव्हाना दिसायला लागले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करत गणेशोत्सव साजरा करणे प्रत्येकाचे कर्तव्य बनते. त्यामुळे मंडळांसह घरगुती गणेशोत्सवातही पीओपीऐवजी शाडूच्या मूर्ती घ्याव्यात.
- डॉ. एकनाथ कुलकर्णी

Web Title: nashik news eco friendly use in ganeshotsav