एकलहरेतील चिमणीची उंची 150 मीटर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

केंद्राच्या निर्णयाने प्रस्तावित 660 मेगावॉट संचाच्या कामाला गती

केंद्राच्या निर्णयाने प्रस्तावित 660 मेगावॉट संचाच्या कामाला गती
नाशिक - पाच वर्षांपासून चिमणीच्या उंचीमुळे संरक्षण विभागाच्या लाल फितीत अडकलेल्या एकलहरे वीज केंद्रातील प्रस्तावित 660 मेगावॉट वीज संचाच्या चिमणीची उंची 150 मीटरपर्यंत कमी करण्यास केंद्राने मान्यता दिल्याने या वीज संचाचे काम मार्गी लागेल. प्रस्तावित चिमणीच्या 280 मीटर उंचीला संरक्षण विभागाने हरकत घेतली होती.

त्यामुळे एकलहरेतील वीज केंद्राचे काम रखडले आहे. खासदार हेमंत गोडसे यांचा केंद्राकडे या विषयावर पाठपुरावा सुरू होता. संसदेतही शून्य प्रहरात हा विषय घेतला होता. राज्य शासनाने एकलहरे वीज प्रकल्पातील 2 बाय 140 या संचाचे आयुष्य संपल्याने ते पाडून त्या जागी 660 मेगावॉटच्या नवीन प्रकल्पाला डिसेंबर 2011 मध्ये मान्यता दिली होती; मात्र एकलहरेपासून काही अंतरावरच संरक्षण विभागाचे प्रशिक्षण केंद्र असल्याने वीज कंपनीच्या प्रस्तावित 280 मीटर उंचीच्या चिमणीला संरक्षण खात्याने हरकत घेतली.

"महाजेनको'ने जानेवारी 2012 ला पाच मीटर उंची कमी करत 275 मीटरपर्यंत उंचीवर एकमत झाले; पण विषय प्रलंबित राहिल्याने महाजनकोने पाच मीटर उंची वाढवून पुन्हा 280 मीटरसाठी स्वतंत्र परवानगी मागितली. संरक्षण खात्याने एअर फनेलमुळे दीडशे मीटरपर्यंतच्या उंचीवर परवानगी देता येत नाही, असे कारण सांगून परवानगी नाकारली होती. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अशा वीज प्रकल्पाचे कामकाज रखडले होते.

Web Title: nashik news eklahare electricity center height 150 meter