अकरावी प्रवेशप्रक्रियेला शुक्रवारपासून सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

दोन टप्प्यांत प्रक्रिया; माहितीपुस्तिकांच्या आधारे भरता येईल अर्ज

दोन टप्प्यांत प्रक्रिया; माहितीपुस्तिकांच्या आधारे भरता येईल अर्ज
नाशिक - यंदा प्रथमच अकरावीची ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया 2 जूनपासून सुरवात होणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात 2 ते 10 जूनदरम्यान शाळांमार्फत विद्यार्थ्यांची वैयक्‍तिक माहिती भरून घेणे, दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालय निवडीची प्रक्रिया असेल. 2 जूनपासूनच विद्यार्थ्यांना शाळांमार्फत माहितीपुस्तिका वितरित केल्या जातील.

अकरावी प्रवेशप्रक्रियेसंदर्भात गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, प्रवेशप्रक्रियेचे समन्वयक एस. जी. आवारी, आर. जी. जाधव, सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, उपशिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक, सुनीता धनगर, ए. एम. बागूल, के. डी. मोरे आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत वैभव सरोदे यांनी स्लाइड शोद्वारे ऑनलाइन प्रवेशाविषयी माहिती दिली. अकरावीची प्रवेशप्रक्रिया दोन टप्प्यांत होईल. पहिल्या टप्प्यात 2 जूनला माध्यमिक शाळेतून अर्जाचा भाग-1 भरावा लागेल.

यात विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल, आरक्षण इत्यादी प्राथमिक माहिती असेल. माहिती योग्य असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी केल्यानंतर अर्जाची प्रिंट निघेल. विद्यार्थ्यांना हा अर्ज भरण्यासाठी 10 जूनपर्यंत मुदत असेल. दहावीचा ऑनलाइन निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत प्रवेश अर्जातील भाग-2 पूर्ण केला जाईल. यात विद्या शाखा, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येईल.

प्रवेशप्रक्रियेविषयी माहितीपुस्तिका शाळांना 31 मेपूर्वी उपलब्ध होतील. शाळांमार्फत 2 जूनपासून विद्यार्थी-पालकांना माहितीपुस्तिकेचे वितरण होईल. त्यासाठी 150 रुपये शुल्क असेल. माहितीपुस्तिकेतून विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी, पासवर्ड दिला जाईल. पुस्तिकेसाठी विद्यार्थ्यांना दहावीचे प्रवेशपत्र दाखविणे आवश्‍यक असेल.

दृष्टिक्षेपात...
*54 कनिष्ठ महाविद्यालयांत सुमारे 24 हजार जागा उपलब्ध.
*खासगी क्‍लासेस, सायबर कॅफेतून अर्ज भरता येणार नाहीत.
*विद्यार्थ्यांना शाळेतूनच ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
*अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांद्वारे अर्ज भरता येईल.
*नोंदणीनंतर शिक्षण विभागाकडून मोबाईलवर प्राप्त होईल संदेश.
*प्रत्येक फेरीच्या वेळी शाखा, महाविद्यालयाचा क्रम बदलता येईल.

Web Title: nashik news eleventh admission process start on friday