प्रश्‍नांना भिडून मार्ग शोधण्याचा प्रयोगशील शेतकऱ्यांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक - जिल्हा परिषदेतर्फे कृषी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुढच्या पिढीला शेतीमध्ये व्यावसायिकता आणून विकले जाईल तेच पिकविण्याचे व आपला माल आपणच विकण्याचे तंत्र अवगत करण्याचे आवाहन केले. शेतीमधील समस्यांकडे बघून रडण्यापेक्षा त्या सोडविण्यासाठी स्वत:च मार्ग शोधले पाहिजेत, असा निर्धारही या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्षा नयना गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिणा, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम जगताप, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हेमंत काळे, कृषी समिती सदस्य यशवंत शिरसाठ, महेंद्र काले आदी उपस्थित होते.

सुरवातीला कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कृषी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेतील विजेते पेठ तालुक्‍यातील पंढरीनाथ डगळे (दोनावडे), सुंदराबाई घुटे (फणसपाडा), रवींद्र मौळे (हनुमाननगर) व रवींद्र वाघमारे (गावधपाडा) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. प्रा. तुषार उगले यांनी शाश्‍वत शेतीविषयी माहिती दिली. 

सेंद्रिय शेतीतज्ज्ञ सदाभाऊ शेळके यांनी शेतकऱ्यांनी उत्पादनखर्च किमान ठेवून स्वत:चे मार्केट स्वत:च निर्माण करण्याबाबत अनुभव कथन केले. शिवनाथ बोरसे यांनी, आपण पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेची काळजी घेतो, तशीच पिकाला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेचाही विचार करावा, असे आवाहन केले. आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा गावित यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. कृषी अधिकारी अभिजित जमधडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: nashik news farmer