नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा बंद सुरुच

nashik news farmer strike continues in nashik district
nashik news farmer strike continues in nashik district

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी संपाचा जोर कायम असून जिल्ह्यातील सर्व सतरा बाजार समित्या बंद आहेत. ग्रामीण भागातही आज (रविवार) सकाळपासून वातावरण पेटलेले आहे. न्याहारखेडा (ता.येवला) येथे रस्ता रोको करण्यात आला. दूध रस्त्यावर ओतून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

नगरसुल (ता.येवला) येथे संपकरी शेतकरी पुन्हा आक्रमक झाले होते. येवला-नांदगाव रस्ता आडवत संताप व्यक्त करण्यात आला. बहुतांश दूध संकलन केंद्र बंद असून, दळवट (ता. कळवण) येथे शेतकऱ्यांनी गुजरातला जाणारे ट्रक अडवल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. आज सकाळी शहरात शिंदे, म्हसरुळ येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. उद्या (ता.5) राज्यव्यापी बंदची हाक दिली असल्याने त्याच्या तयारीसाठी आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

म्हसरुळ परिसरात शेतकऱ्यांनी रस्ता रोको करत आंदोलन छेडले. कांदे, दुधी भोपळा व अन्य शेतमाल वाहून नेत असलेला ट्रॅक्टर संतप्त शेतकऱ्यांनी अडविला. तसेच शेतमाल रस्त्यावर फेकले. या वेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी म्हसरूळ ठाण्यातील पोलिसांनी काही आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे येथेही आंदोलक शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. या वेळी टोमॅटो, ढोबळी मिरची अन्य शेतमालासह दुध रस्त्यावर ओतले.

जिल्ह्यातील सर्व सतरा बाजार समित्या तीन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी बहुतांश ठिकाणी शेतमालाचे लिलाव होत नसल्याने आवक जवळपास नव्हती. त्यामुळे अनेक व्यापारी बांधावर खरेदीचे प्रयत्न करीत असले तरी खरेदी केलेला माल बाजारात नेणे अशक्‍य असल्याने तणावाची स्थिती आहे.

लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प असल्याने व्यापाऱ्यांकडे प्रशासन पाठपुरावा करीत आहे. काल रात्री दळवट (कळवण) मार्गे गुजरातला जाणारे भाजीपाल्याचे तीन ट्रक अडवले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर जमले. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्याचा उपयोग न झाल्याने हवेत गोळीबार करावा लागला. त्यानंतर हे ट्रक सापुतारा मार्गे गुजरातला जाऊ शकले. 

आज सकाळी शहरात पुणे रस्त्यावर शेतकरी मोठ्या संख्येने जमले त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. आसखेडा येथे रास्ता रोको झाला. त्यात मोठ्या संख्येने महिला आणि मुलेही सहभागी झाले होते. न्यायडोंगरी (नांदगाव) येथे उद्याच्या बंदच्या तयारीसाठी फलक लावण्यात आले आहेत.

निफाड तालुक्‍यात संपाची तीव्रता अधिक असून विंचूर येथे औरंगाबाद महामार्गावर दूध ओतून रास्ता रोको करण्यात आला. विविध भागात हे लोण पसरले असून आज सायंकाळी चारला नाशिक बाजार समितीत आंदोलनाबाबत संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होत आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, बुधाजीराव मुळीक यांसह विविध नेते सहभागी होतील अशी माहिती संयोजक चंद्रकांत बनकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com