नाशिकमधील बैठकीत ठरणार शेतकरी संपाची पुढील दिशा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

शेट्टी, रघुनाथदादा, कडू, कोळसे-पाटील यांची उपस्थिती

शेट्टी, रघुनाथदादा, कडू, कोळसे-पाटील यांची उपस्थिती
नाशिक - शेतकरी संपाचा वारू खांद्यावर घेत नाशिकमधील शेतकरी समन्वय समितीने संप पुढे नेला असून समितीची राज्यस्तरीय बैठक उद्या (ता.8) दुपारी एकला येथील तुपसाखरे लॉन्समध्ये होईल. या बैठकीमध्ये सात-बारा उतारा कोरा करणे, शेतमालाला हमी भाव मिळणे या मागण्यांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या संपाची पुढील दिशा निश्‍चित होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी हुतात्मा स्मारकामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी बैठक झाली.

खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील हे मध्यरात्रीपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. आमदार बच्चू कडू, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, नामदेव गावडे, डॉ. अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, विश्‍वनाथ पाटील, किशोर ढमाले, डॉ. अजित नवले आदी बैठकीसाठी उपस्थित राहतील. बैठकीला किमान दोनशे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे डॉ. गिरधर पाटील, राजू देसले, हंसराज वडघुले यांनी सांगितले.

दरम्यान, बैठकीच्या आधी राज्यभरातून शहरात येणाऱ्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्य सरकारची भूमिका, सद्यःस्थितीत पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांची खरिपाची सुरू होणारी तयारी आणि त्याअनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा या विषयांवर विचारविनिमय केले जाणार आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा समितीतर्फे जाहीर केली जाणार आहे, अशी सर्वसाधारण रूपरेषा बैठकीची राहील.

Web Title: nashik news farmer strike direction in nashik meeting