शेतकऱ्यांसाठी सरकारच्या मानगुटीवर बसणार -उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - शासनाने हातचे राखून दिलेल्या कर्जमाफीने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. जून 2017 पर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा यासह आठशे रुपये दराने कांदा खरेदी, असे निर्णय घेण्यासाठी शिवसेना सरकारच्या मानगुटीवर बसेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. 

शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, की शिवसेनेमुळेच कर्जमाफी झाली. मध्य प्रदेशच्या एका सत्ताधारी आमदाराने तशी कबुली कालच दिली. शेतकरी लबाड नसून तो घेणारा नाही, तर देणारा आहे. त्याला भीक नको आहे. जून 2017 पर्यंतच्या कर्जमाफीसाठी मी सरकारच्या मागे लागणार आहे. 

मार्च 2017 पर्यंत कर्जमाफी, स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणे व शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी आमदार अनिल कदम यांनी केली. पिंपळगाव ग्रामपालिकेचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव बनकर म्हणाले, की शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ निफाड तालुक्‍यात अवघ्या 12 टक्के शेतकऱ्यांना झाला आहे. आमचा सातबारा कोरा झाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. 

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा 
न्याय मागणे तुमच्या राज्यात गुन्हा ठरत असेल, तर असे सरकार मी माझ्या राज्यात शिल्लक ठेवणार नाही. शेतकरी आंदोलनात जितके गुन्हे तुमच्यावर नोंदलेले आहेत, त्यातील एकही गुन्हा मी शिल्लक ठेवणार नाही. सर्व गुन्हे मागे घ्यायला लावणार असल्याचा विश्‍वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लासलगाव येथे शेतकऱ्यांना दिला. सरकारच्या लेखी गुन्हेगार असलेल्या या शेतकऱ्यांबरोबर माझा फोटो काढा. मला त्याचा अभिमान आहे. हिंमत असेल तर सरकारने माझ्यावर गुन्हा टाकावा. या सर्व शेतकऱ्यांसोबत शिवसेना आहे. कर्जमाफीच्या निर्णयाचे खरे मानकरी तुम्ही आहात. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची एकजूट खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरली, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

Web Title: nashik news farmer uddhav thackeray