3 महिने उलटूनही मदत नाही; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा संसार उघड्यावर

खंडू मोरे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

तीन महिने उलटून गेल्यानंतरही शेतकरी आत्महत्येच्या मदतीपासून हे कुटुंब वंचित राहिले आहे. पाठपुरावा करण्यासाठी कुटुंबात कुणीही पाठीमाघे नसल्याने जिल्हा अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचे बागलाण तहसील विभागाकडून सांगितले जात आहे.

खामखेडा (नाशिक) : आखतवाडे ता बागलाण येथील किशोर बापू खैरनार या तरुण शेतकऱ्याने जुलै महिन्यात आत्महत्या केली. तीन महिने उलटूनही शासकीय मदत न मिळाल्याने हे कुटुंबीय व्यवस्थेचा बळी ठरले आहेत. ह्या शेतकऱ्याची पत्नी सोनाली व तिच्या दोघा चिमुरड्यांची उपजीविका भागविताना होणारी ओढाताण आत्महत्येनंतर देखील कुटुंबाची विवंचना कायम असून ह्या चिमुरड्याच्या शिक्षणासाठी  मदतीचे आवाहन केले आहे.  

आखतवाडे (ता. बागलाण) येथील बियाणाला पैसे नाहीत व संसाराच्या ओढाताणीतून ३४ वर्षीय किशोर बापू खैरनार तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या विहिरात उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवली. तीन वर्षाचा असतांना त्याचे वडील गेलेत. कुटुंबाची जबाबदारी किशोरवर येऊन पडली. कौटुंबिक संघर्ष करत असतांना आईस मोठ्या आतड्याचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. आईने २००८ जगाचा निरोप घेतला. लग्नाआधीच किशोर पोरका झाला. आई वडील नसलेल्या सोनाली व किशोरचा २०११ मध्ये साध्या पद्धतीने विवाह झाला. नव्या उमेदीने शेतीमध्ये भांडवल टाकून शेती करण्याची सुरवात केली. मात्र पाणीटंचाई, दुष्काळ, सततची नापिकी लहानपणापासून संघर्षमय जीवन यामुळे वैफल्यग्रस्त किशोरने आषाढी एकादशीच्या दिवशी आत्महत्या केली.

किशोरच्या आत्महत्येने प्रश्न सुटले नाहीत, उलट त्यांच्या पत्नीच्या खांद्यावर न पेलणारी जबाबदारी व अवघ्या चोवीसव्या वर्षी सुखी संसाराची वीण बसण्याआधीच विधवा झालेल्या सोनालीवरएकाकीपणे रोजच्या जगण्याची लढाई उभी ठाकली आहे. पतीच्या आत्महत्येमुळे संसार कसा उद्‌ध्वस्त होतो याची आपबिती कथन करताना विस्कटलेली घडी सावरण्याची जिद्द मात्र कायम असल्याचे त्यांनी कणखरपणे बोलून दाखविले.

किशोरच्या जाण्याने कुटुंबाची उपेक्षा मात्र कायम आहे. घरात कर्ते कुणीच नसल्याने अवघ्या चार वर्ष व सहा वर्ष्याच्या दोन चिमुरड्याचा सांभाळ करताना सोनालीची दमछाक होत आहे. २४ व्या वर्षीच सोनालीला विधवा होण्याचे दुर्भाग्य वाट्याला आले. दोघा निष्पाप चिमुकल्यांसाठी उभी राहत, त्यांना शिक्षण देऊन मोठे करण्याचा तिचा मानस आहे. मात्र यासाठी गरज आहे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हातांनी मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याची.  आपल्या लहान मुलांच्या शिक्षणाची काळजी कुणीतरी घ्यावी असे आवाहन सोनालीकडून होत आहे. या कुटुंबास मदत करून त्यांचे मनोबल वाढवत सावरण्यासाठी समाजातील दानशूरांनी ७५८८२९५१४३ या नंबरवर संपर्क साधावा.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nashik news farmers suicide affected family helpless