आठ हजारांवर वाहनांची चाके थांबणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

जुने नाशिक - शेतकऱ्यांच्या संपामुळे शेतीव्यवसायावर अवलंबून असलेल्या मालवाहतूक व्यवसायाला दररोज सुमारे ६० लाखांचा फटका बसणार असल्याचे वाहतूक संघटनांकडून सांगण्यात आले. 

जुने नाशिक - शेतकऱ्यांच्या संपामुळे शेतीव्यवसायावर अवलंबून असलेल्या मालवाहतूक व्यवसायाला दररोज सुमारे ६० लाखांचा फटका बसणार असल्याचे वाहतूक संघटनांकडून सांगण्यात आले. 

राज्य सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून, बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर निघाले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम शेतमालाच्या वाहतूक व्यवसायावर होईल. शेतकऱ्यांकडून पिकविण्यात येणारा शेतमाल वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून बाजारात अर्थात नागरिकांपर्यंत पोचविण्यात येतो. शहर-जिल्ह्यात सुमारे १५ हजार ट्रक-टेम्पोच्या माध्यमातून शेतमालाची आवक-जावक होते. सध्या यातील ५० ते ६० टक्के अर्थात, आठ ते नऊ हजार वाहने शेतमालाची वाहतूक करत आहेत. अन्य वाहने औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शेतमालाची वाहतूक करणाऱ्या सुमारे आठ हजार वाहनांमधील बाराशे वाहने दैनंदिन शेतमालाची वाहतूक करतात. बाराशे वाहनांतील २०० वाहने कांदा वाहतूक करतात. अन्य एक हजार वाहने भाजीपाल्यासह विविध शेतीव्यवसायाशी संबंधित साहित्य मालाची वाहतूक करतात.  संप लांबल्यास कोटींची उलाढाल ठप्प होऊन नुकसान होणार आहे. एका ट्रकमागे चालक, क्‍लीनर, मालक, तसेच संबंधित व्यवसायचालक, कामगार अशा सुमारे दहा कुटुंबांवर शेतकरी संपाचा परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.

वाहतूक व्यवस्थेवरील घटक
वाहतूक व्यवस्था  वाहनचालक, क्‍लीनर  गॅरेजवाले  ग्रीसवाले
स्पेअर पार्ट  चारा व्यापारी
बॅंक व्यवहार  आरटीओ, टोल नाक्‍यांसह अन्य विविध कर

शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्‍न वेळीच सोडविणे आवश्‍यक आहे. अन्यथा भविष्यात वाहतूकदारांसह त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे.
- अंजू सिंगल, अध्यक्ष,  नाशिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

वाहनांच्या सर्व्हिसिंगमधून मिळणाऱ्या मजुरीवर कुटुंबाचा उदर्रनिर्वाह चालतो. संपामुळे वाहने जास्त दिवस बंद राहिल्यास आमच्या कुटुंबाला उपासमारीचा सामना करावा लागेल.
- अर्षद सय्यद, गॅरेज कामगार

Web Title: nashik news farmerstrike