'जीएसटी'मुळे उतरल्या खतांच्या किमती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - देशात जीएसटी लागू झाल्यानंतर खतांच्या किमतीमध्ये घट झाली आहे. सरकारने खतांचा समावेश 12 टक्के गटाच्या गटातून काढून पाच टक्‍क्‍यांच्या गटात केल्याने खतांच्या किमतींमध्ये घट झाली आहे. खतांच्या किमतीमधील ही घट प्रत्येक गोणीमागे पाच रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विक्रेत्यांनी नवीन किमतीनेच खतांची विक्री करावी, अशा सूचना कृषी विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

देशात जीएसटी लागू होण्याआधी रासायनिक खतांचा समावेश 12 टक्‍क्‍यांच्या कर गटात होता. त्या आधी सहा टक्के व्हॅट व एक टक्का अबकारीकर अशी टक्के करआकारणी होत होती; परंतु जीएसटीमुळे खतांच्या किमतीत पाच टक्‍क्‍यांनी वाढ होण्याची शक्‍यता वर्तविली जात होती; परंतु ऐनवेळी सरकारने रासायनिक खतांचा पाच टक्के करांच्या गटात समावेश केल्याने किमतींमध्ये एक टक्का घट झाली आहे.

रासायनिक खतांच्या कंपन्यांनी 1 जुलैनंतर वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन त्यांच्या कंपनीच्या खतांच्या किमती जाहीर केल्या असून, त्यानुसार खते गोणीमागे पाच ते 75 रुपयांनी स्वस्त झाली आहेत.

कृषी निविष्ठांच्या घाऊक; तसेच किरकोळ विक्रेत्यांनी 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतरच्या नवीन दरानेच खतांची विक्री केली पाहिजे; तसेच दुकानाबाहेर खतांच्या नवीन किमती फलकावर लिहिल्या पाहिजेत. सुधारित दराने विक्री न करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा जिल्हा कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी दिला आहे.

Web Title: nashik news fertilizer rate decrease by gst