नांदूरमध्यमेश्‍वरला फ्लेमिंगोंचे शेकडोंच्या संख्येने आगमन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नांदूरमध्यमेश्‍वर - येथील पक्षी अभयारण्यात एरवी डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान मोजकेच दृष्टीस पडणारे फ्लेमिंगोंचे (रोहित पक्षी) तीन दिवसांपूर्वी शेकडोंच्या संख्येने येथील जलाशयात आगमन झाले. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने मेचा अपवाद वगळता वर्षभर धरणात पाण्याचा साठा उपलब्ध होता. साहजिकच शेवाळ, पाणवनस्पती व कीटकांची अधिक प्रमाणात उत्पत्ती झाल्याने पक्ष्यांना मुबलक प्रमाणात जलाशयात खाद्य उपलब्ध झाले आहे.

दर वर्षी वर्षभरात मोजक्‍याच प्रमाणात दृष्टीस पडणारे फ्लेमिंगो यावर्षी जूनमध्ये सव्वाशेच्या संख्येने जलाशयात आढळून आले. हा पक्षी मूळचा कच्छचे रणातळचा... तेथे या पक्ष्यांच्या लाखोंच्या संख्येने वसाहती आहेत. ऑक्‍टोबर ते मार्चदरम्यान तेथे पाण्याची अनुकूलता असल्यामुळे यादरम्यान मादी एक किंवा दोन अंडी घालते. ती अंडी उबविल्यानंतर नर, मादी पिलांना सोडून अन्नाच्या शोधार्थ पाणथळ जागी वास्तव्यास येतात. त्यांची पिले काठावरील कीटक खाऊन आपले भक्ष्य मिळवतात. अन्न साधनेच्या वेळी या पक्ष्यांचा जोराजोराने किलबिलाट होतो. ते कळपाने अवकाशात उडतात. झेप घेण्यापूर्वी थोडा वेळ स्थिर व शांत राहून जणू दूरच्या संदेशाचे संवेदनशील इंद्रियाचे ग्रहण चाललेले असावे व पुढील मार्ग बिनधोक आहे, असे समजून तेथे अन्न मुबलक आहे, असा संदेश मिळाल्यामुळे त्यांचा कळपप्रमुखाच्या आदेशानुसार सगळे पक्षी एकाच वेळी अवकाशात झेप घेतात. त्यांचे अंग फिक्कट गुलाबी पांढरे असते. पाय लांबसडक गुलाबी असून, त्यांची साधारण चार फुटापर्यंत उंची असते. आपली चोच पाण्याच्या प्रवाहात आडवी धरून आपले अन्न ते मिळवतात. मुंबई, शिवडी उपनगर परिसरात या पक्ष्यांच्या लाखोंच्या संख्येने वसाहती आहेत. मुंबईला पाऊस सुरू झाल्यामुळे व येथील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तेथील वातावरण या पक्ष्यांना पोषक ठरत नसल्याने हे पक्षी थव्याथव्याने गंगापूर, वाघाड, जायकवाडी, नांदूरमध्यमेश्‍वर तसेच गुजरातमधील एलआरके जलाशयात स्थलांतर करतात.

या वर्षी हे पक्षी गंगापूर धरणात येऊन ते जायकवाडी जलाशयाकडे स्थलांतर करताना नांदूरमध्यमेश्‍वर जलाशयात काही दिवस वास्तव्य करतील, अशी माहिती आपल्या अनुभवाद्वारे येथील गाईड व पक्षीमिक्ष गंगाधर आघाव, अमोल दराडे, प्रमोद दराडे, अमोल डोंगरे, शंकर लोखंडे व वनमजूर गोगडे यांनी ‘सकाळ’ला दिली.

Web Title: nashik news flemingo