तीन महिन्यांपासून इंधनाचे २८ लाख थकले

प्रशांत बैरागी 
सोमवार, 12 जून 2017

नामपूर - जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजाच्या पद्धतीमुळे बागलाण तालुक्‍यात टंचाईग्रस्त गावांना आगामी काळात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या शासकीय टॅंकरना करण्यात येणाऱ्या इंधन पुरवठ्याची सुमारे २८ लाख रुपयांची बिले तीन महिन्यांपासून रखडल्याने पेट्रोलपंप मालकांनी इंधन पुरवठा रोखल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

नामपूर - जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजाच्या पद्धतीमुळे बागलाण तालुक्‍यात टंचाईग्रस्त गावांना आगामी काळात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या शासकीय टॅंकरना करण्यात येणाऱ्या इंधन पुरवठ्याची सुमारे २८ लाख रुपयांची बिले तीन महिन्यांपासून रखडल्याने पेट्रोलपंप मालकांनी इंधन पुरवठा रोखल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

बागलाण तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई भेडसावणाऱ्या गावांना साधारणपणे जानेवारीपासून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टॅंकरची मदत घेण्यात आली. तालुक्‍यात १७ टंचाईग्रस्त गावे व एक वाडी अशा १८ गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यासाठी नामपूर व सटाणा येथील खासगी पेट्रोलपंपांच्या मदतीने तालुका प्रशासनाने उधारीवर डिझेल उपलब्ध करून दिले. सुरवातीला दर महिन्याला पेट्रोलपंप मालकांना इंधनभाडे अदा केले जात होते. परंतु, तीन महिन्यांपासून तालुक्‍यातील पेट्रोलपंपांना इंधनविक्रीचा मोबदला मिळालेला नाही. बागलाण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी पेट्रोलपंप मालकांना विनंती करून इंधन पुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.

बागलाण तालुक्‍यातील टंचाईग्रस्त गावे अशी -
खिरमानी, सारदे, राहुड, इजमाने, रामतीर, चिराई, अजमीर सौंदाणे, चौगाव, सुराणे, बहिराणे, देवळाणे, भाक्षी, मळगाव भामेर, कातरवेल, नवेगाव, महड, रातीर, वघानेपाडा

बागलाण तालुक्‍यात ३० जूनपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन आहे. इंधन बिलांची दरमहा मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. परंतु, तीन महिन्यांपासून अनुदानाअभावी पंपमालकांना बिलांची रक्कम अदा करता आली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे.
- महेंद्र कोर, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बागलाण

तीन महिन्यांपासून डिझेल बिलापोटी शासनाकडे सुमारे १७ लाख रुपये थकले आहेत. आर्थिक कोंडी झाल्याने डिझेल पुरवठा बंद केला आहे. शासनाने तातडीने बिलांची रक्कम अदा करावी.
- योगेश मोराणे, पेट्रोलपंप मालक, नामपूर

बागलाण तालुक्‍यात तुरळक पावसाचा अपवाद वगळता समाधानकारक पाऊस झालेला नाही. तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेण्यात येईल.
- दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

Web Title: nashik news fuel water tanker