गावठाणांना पन्नास लाखांचा निधी - भानसी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नाशिक - महापालिका स्थापन करताना शहरालगत असलेल्या २२ खेड्यांचा समावेश केला होता. परंतु २५ वर्षांपासून ती खेडी शहरात असूनही विकासापासून कोसो दूर आहेत. या खेड्यांच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात प्रत्येकी पन्नास लाखांची तरतूद करण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात जाहीर केला.

नाशिक - महापालिका स्थापन करताना शहरालगत असलेल्या २२ खेड्यांचा समावेश केला होता. परंतु २५ वर्षांपासून ती खेडी शहरात असूनही विकासापासून कोसो दूर आहेत. या खेड्यांच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात प्रत्येकी पन्नास लाखांची तरतूद करण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात जाहीर केला.

१९८२ मध्ये नाशिक महापालिकेची घोषणा झाली. महापालिकेच्या हद्दी निश्‍चित करताना २२ खेड्यांचा समावेश करण्यात आला. त्यात कामटवाडे, अंबड, वडनेर दुमाला, नांदूर, मानूर, आडगाव, दसक, पंचक, चेहडी, चाढेगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, गंगापूर, पाथर्डी, वडाळा आदी गावांचा समावेश होता. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर रस्ते, पथदीप, दवाखाने, पाणीपुरवठा आदींची सुविधा पुरविणे आवश्‍यक होते; परंतु त्या सुविधा पुरेशा प्रमाणात पुरविल्या गेल्या नाहीत. त्या गावांसाठी स्वतंत्र निधीचीदेखील तरतूद करण्यात न आल्याने शहराचा दर्जा मिळूनही गावातील गावपण कायम राहिले आहे. विनायक पांडे महापौर असताना गावांच्या विकासासाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला होता; परंतु निधी देण्याची प्रथा कायम राहिली नाही. गावांमधील समस्यांसदर्भात ‘सकाळ’मध्ये ‘गाव बनले व्हिलेज’ या सदराच्या माध्यमातून गावांचा इतिहास, परंपरेचे चित्र मांडताना तेथील समस्यादेखील मांडल्या जात आहेत. महापौर भानसी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यानिमित्त गावांमध्ये भविष्यात काय कामे करावी लागतील, याबाबत दिशा मिळण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. ग्रामीण भागातील प्रभागांसाठी निधीची तरतूद करण्याचे जाहीर केले. गावांमधील प्रत्येक प्रभागासाठी पन्नास लाखांची अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीतून रस्ते, पाणीपुरवठ्याची सुविधा, पथदीप, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह तसेच पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने कामे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: nashik news fund nashik mayor