सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

नाशिक - महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी धडपड सुरू असताना, काही ठिकाणांहून अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने अखेरीस महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. दंडात्मक कारवाई दोनदा झाल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र थेट फौजदारी कारवाई केली जाईल. 

नाशिक - महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी धडपड सुरू असताना, काही ठिकाणांहून अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने अखेरीस महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. दंडात्मक कारवाई दोनदा झाल्यानंतर तिसऱ्यांदा मात्र थेट फौजदारी कारवाई केली जाईल. 

केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारचे पथक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शहरात दाखल होणार आहे. त्यापूर्वी महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. 

पहिल्या वर्षी महापालिका ५६ व्या क्रमांकावर होती. दुसऱ्या वर्षाच्या सर्वेक्षणात १५३ व्या क्रमांकावर नाशिक गेल्याने याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. थेट मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याने महापालिकेने आतापर्यंत स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना सुरू केल्या. 

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी खास पथकाचीही निर्मिती करण्यात आली. स्वच्छतागृहांची निर्मिती, कचरा वर्गीकरणासाठी बाजारपेठेत कचरापेट्यांची उपलब्धता, शहरात रंगरंगोटी, रस्त्यांची स्वच्छता, कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट नष्ट करणे आदी उपाययोजना केल्या जात आहेत. स्वच्छतेच्या उपाययोजना करताना काही भागांत अजूनही स्वच्छतेबाबत सजगता दिसून येत नाही. शिवाय सार्वजनिक भागात कायमस्वरूपी स्वच्छता राहावी म्हणून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानंतरही स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी आढळल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले. स्वच्छता सर्वेक्षणासाठी केंद्र सरकारचे पथक बुधवारी (ता. १७) नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्‍यता आहे.

वेस्ट टू एनर्जीला लिंक करणार
जर्मन सरकारच्या जीआयझेड कंपनीकडून महापालिकेच्या खतप्रकल्पावर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू झाला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून ९९ हजार युनिट वीजनिर्मिती करण्यासाठी १५ टन ओला कचरा आवश्‍यक आहे; परंतु शहरातून अवघा सात ते आठ टन कचरा प्रतिदिन उपलब्ध होत असल्याने मंगल कार्यालये, लॉन्स व हॉटेले वेस्ट टू एनर्जीला लिंक केले जातील, असे आयुक्त कृष्णा यांनी स्पष्ट केले.

Web Title: nashik news garbage nashik municipal corporation