गॅस दरवाढीच्या दणक्‍याने गृहिणींचा संताप 

गॅस दरवाढीच्या दणक्‍याने गृहिणींचा संताप 

नाशिक .  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या घसरलेल्या किमतीचा फायदा देशातील ग्राहकांना झाला नाही, अशी टीकेची झोड विरोधकांनी उठवली. मात्र, त्याकडे कानाडोळा करत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका सुरू ठेवला आहे. तीन महिन्यांत सिलिंडरमागे 217 रुपयांची दरवाढ झाली. महिन्याला खपणाऱ्या साडेपाच लाख सिलिंडरचा विचार करता ग्राहकांना 11 कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यामुळे घरखर्चाची कसरत करणाऱ्या गृहिणी संतापल्या आहेत. 

नाशिकमध्ये घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी ऑगस्टमध्ये 522 रुपये मोजावे लागत होते. सप्टेंबरमध्ये हाच दर 596 झाला. दिवाळी साजरी करताना ग्राहकांना ऑक्‍टोबरमध्ये 645 रुपये मोजावे लागले. आज हाच दर 738 रुपये 50 पैसे इतका झाला आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलोग्रॅम गॅस सिलिंडरचा सप्टेंबरमध्ये एक हजार 81, ऑक्‍टोबरमध्ये एक हजार 158 रुपये दर होता. आज हाच दर एक हजार 304 रुपये 50 पैसे इतका झाला. गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे महागाईला निमंत्रण मिळाले आहे. त्यातच थंडी वाढली असून या काळात पाणी गरम करण्यापासून ते अन्न शिजवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक गॅसची गरज भासते. सिलिंडर विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार थंडीमध्ये शहरात किमान 50 हजार सिलिंडरची अधिक मागणी होते. आताची 94 रुपयांची भाववाढ लक्षात घेता, वाढणाऱ्या खपातूनही ग्राहकांच्या झळीमध्ये भर पडेल. 

खासगी कंपन्यांना प्रोत्साहनाचा आक्षेप 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर इंधनाचे भाव अवलंबून असल्याने पुढील काही महिन्यांमध्ये आणखी भाववाढीचा त्रास ग्राहकांना सोसावा लागणार असल्याचा दुकानदारांचा अंदाज आहे. त्याचवेळी काही दुकानदारांनी सरकारच्या धोरणांबद्दल आक्षेप नोंदवण्यास सुरवात केली आहे. प्रचलित कंपन्यांऐवजी खासगी कंपन्यांनी गॅसची किंमत ठेवल्यास त्याचा फायदा खासगी कंपन्यांना होईल. त्यामुळे खासगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण स्वीकारले जात नाही ना? असा प्रश्‍नही दुकानदारांचा आहे. 

गृहिणी म्हणतात... 
खरे म्हणजे, घरखर्चाचे प्रत्येक महिन्याचे नियोजन ठरलेले असते. त्यात बदल झाले, की पैसे उसने घेऊन गरजा भागवाव्या लागतात. गॅस जीवनावश्‍यक वस्तू असून, किराणा मालापेक्षा गॅसची किंमत जास्त झाली आहे. 
- संध्या नवले 

नोटाबंदीच्यावेळी हातचा रोजगार सोडून पोस्टात चकरा माराव्या लागत होत्या. ऑगस्टपासून सिलिंडर दरवाढीचे धोरण स्वीकारल्यामुळे आता भलीमोठी दरवाढीची झळ बसतेय. त्यामुळे हेच का "अच्छे दिन', असे म्हणायची वेळ आली आहे. 
- प्रणाली खरे 

रेशन दुकानातून रॉकेल मिळणे बंद झाल्याने गॅस वापरण्याशिवाय पर्याय नाही. काळ्या बाजारात मिळणाऱ्या रॉकेलचा लिटरचा भाव 70 रुपयांपर्यंत पोचला आहे. त्यातच, दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या होणाऱ्या दरवाढीमुळे नेमके काय करायचे? 
- सपना पवार 

स्वयंपाक, सकाळी अंघोळीला पाणी तापवण्यापासून घरात गॅसचा वापर होतो. एक सिलिंडर काटकसर करून दीड महिना जाते. चार महिन्यांपासून गॅसची किंमत वाढतच आहे. त्यामुळे दर महिन्याला बजेट कोलमडत आहे. 
- सुनंदा पानपाटील 

आता थंडी सुरू झाल्याने गॅस अधिक लागतो. घरातील सदस्यांची संख्या अधिक असल्याने महिनाभर काटकसर करत सिलिंडर जाते. आता थेट 95 रुपये जादा मोजावे लागतील. ही गरिबांची पिळवणूक आहे. 
- पुष्पा वाबळे 

सामान्य माणसाच्या ज्या गरजेच्या गोष्टी असतात, त्यांची दरवाढ केली जाते. पेट्रोल- डिझेलचे भाव रोज बदलतात. आता सिलिंडरची किंमत वाढली. ही भाववाढ कायम राहिल्यास पर्याय शोधावा लागणार आहे. महागाईपासून दिलासा मिळायला हवा. 
- दीपाली जाधव 

गॅस सिलिंडरची सातत्याने होणारी दरवाढ महिलांचे गृहखर्चाचे गणित मोडकळीस आणत आहे. भावातील वाढ भलीमोठी आहे. सामान्य कुटुंबांना दरवाढीचा त्रास होत आहे. अन्य जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत. 
- भावना चव्हाण 

सध्याचा हिवाळा अन्‌ गॅसची भाववाढ अशा दुहेरी संकटात आम्ही सापडलो आहोत. दरवाढीमुळे विजेच्या साधनांचा वापर वाढवावा लागणार. मात्र. त्यांचीही बिले भरमसाट येत आहेत, सामान्यांची ही कोंडीच आहे. 
- गायत्री चित्ते 

रेशन दुकानातून रॉकेल हद्दपार झाल्याने गॅसवर अवलंबून राहावे लागत आहे. महिनाभरात झालेल्या वारंवार दरवाढीतून जवळपास 200 रुपये जास्त द्यावे लागत आहेत. गॅसला पर्याय तरी उपलब्ध करून द्यावेत. 
- निकिता गाढवे 

सामान्यांची ही आर्थिक पिळवणूक आहे. 94 रुपयांची एकदम दरवाढ म्हणजे वर्षभरात मोठी रक्कम गॅसवर जाणार आहे. सामान्यांचे रोजचे जगणे त्यामुळे अवघड होत आहे. 
- लीना रानडे 

गॅस दरवाढीमुळे महिलांना स्वयंपाक करताना मोठी कसरत करावी लागते. महिनाभर गॅस सिलिंडर पुरवण्यासाठी रॉकेल, शेगडी, इलेक्‍ट्रिक वस्तूंचा वापर वाढवावा लागतो. एकीकडे चुली हद्दपार व्हाव्यात म्हणून प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे दरवाढ केल्याने तेच होत आहे. 
- गायत्री महाले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com