सोनपावलांनी घरोघरी  आज गौराईचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

नाशिक - कुटुंबात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थात गौराई (महालक्ष्मी)चे  आज (ता. २९) सोनपावलांनी आगमन होत आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ तीन-चार दिवसांनी येणाऱ्या गौराईच्या आगमनाबद्दल कुटुंबात नेहमीच उत्सुकता असते. गौरीचा साजशृंगार, आरास आणि त्या जोडीला महापूजा व फराळ करण्यात अवघे कुटुंब दंग असल्याचे चित्र आज शहर व परिसरात पाहायला मिळाले.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेमुळे शहरात सध्या सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण आहे. त्यातच आता आजपासून गौराईचे आगमन होत असल्याने ज्या कुटुंबामध्ये गौराई विराजमान होते, त्या कुटुंबात आनंद, उत्साह द्विगुणित होत आहे. गौरीची सर्व तयारी पूर्ण झालेली असल्याने सारेच जण गौरींची आतुरतेने वाट पाहत आहेत. गौरी तीन दिवस माहेरवाशिणी म्हणून येतात. त्यात पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी महापूजा, मिष्टान्नाचे जेवण व त्यानंतर प्रसादवाटप, हळदीकुंकू, तर तिसऱ्या दिवशी पूजन, दही, दुधभातांचा नैवद्य दाखवून गौरी विसर्जन केले जाते. 

गौरी म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच घरात आगमनावेळी गौरींचे ज्येष्ठा-कनिष्ठा असे दोन मुखवटे ताम्हणात घेऊन रांगोळीच्या पावलांनी वाजतगाजत बाहेरून तिला घरात आणले जाते. त्या वेळी ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’ असेही म्हटले जाते. गौरींपुढे दोन बाळे पण  ठेवतात. गौरींच्या महापूजा, नैवेद्यानंतर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ, तर दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य या प्रमुख पदार्थांना प्राधान्य दिले जाते. तिसऱ्या दिवशी सायंकाळी चारनंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

गौराई मुहूर्त आगमन
गौराई आगमन (ता. २९) मंगळवारी- अनुराधा नक्षत्रावर, सकाळी ११.४८ ते दुपारी २.१ या वेळात अवाहन करू शकतो. लक्ष्मी आवाहन स्थिर लग्नावर व्हावे. यासाठी सूर्योदयापासून काही तास वगळले आहेत. सकाळी बसविता न आल्यास सायंकाळी ७.३६ ते ९.११ या वेळेत गौराईचे आगमन होऊ शकते, असे रामदासी गुरुजी यांनी सांगितले.

Web Title: nashik news Gaurai

टॅग्स