सुदृढ, स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी योग अपरिहार्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

दिवसातील तासभराचा योग अभ्यास ठेवूशकतो ठणठणीत, तज्ज्ञांचा सल्ला

दिवसातील तासभराचा योग अभ्यास ठेवूशकतो ठणठणीत, तज्ज्ञांचा सल्ला
नाशिक - योग काही कुठल्या आजारावरील औषधाप्रमाणे नाही, की जेव्हा एखादी व्याधी झाली की उपचार म्हणून योग करायचा. योग ही साधना असून, त्यात सातत्य असायला हवे. दिवसभरातील साधारणत: एक तासाचा योग अभ्यास प्रकृती ठणठणीत ठेवूशकतो, असा दावा तज्ज्ञ करतात. सुदृढ जीवनासाठी योगाला जीवनशैली बनविण्याची गरज जागतिक योग दिनानिमित्त व्यक्‍त केली जात आहे.

जीवनात चालते, फिरते राहाणे, चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. वाढत्या वयासोबत उद्भवणाऱ्या व्याधी, शारीरिक झिज यांसह सध्या तरुणांमध्ये जाणवणारी तणावाची स्थिती असे शारीरिक आणि मानसिक आजार दूर ठेवायचे असतील तर योग अभ्यास उपयुक्‍त ठरू शकतो. पाश्‍चात्य देशांना योगाचे महत्त्व अलीकडे कळू लागले असल्याने तेथे योगाचा अभ्यास आणि सराव मोठ्या स्वरूपात सुरू झाला आहे. योग साधना ही केवळ योगासनांपुरती मर्यादित नसून, त्यात आहार-विहार यांच्यापासून दैनंदिन जीवनातील वर्तणुकीचाही समावेश होतो. त्यामुळे योग ही एक प्रकारची जीवनशैली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हृदयविकार, मधुमेह या व्याधी शरीराच्या आतील भागाशी निगडित आहेत. त्यामुळे या व्याधी होऊ नयेत याकरिता योगासने करता येऊ शकतात. त्यात प्रामुख्याने कपालभातीद्वारे श्‍वासावर नियंत्रणासोबत आतड्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. पचनाची क्रिया सुधारते. सुदृढ, आजारी, वयोवृद्ध सर्वच वयोगटांतील आणि प्रकारातील व्यक्ती गरजेप्रमाणे हा योग करू शकतात. मंडुकासन, शशकासनदेखील उपयुक्‍त आहेत. हृदयविकार टाळण्यासाठी भस्रीका प्राणायाम उपयोगी ठरतो. याद्वारे फुफ्फुसांना पुरेसा ऑक्‍सिजन मिळून हृदयातील रक्‍तपुरवठ्यालाही चालना मिळते.

विविध व्याधी आणि त्यांच्यासाठी उपयुक्‍त योगासने -
पाठ, कंबर, मणके दुखी - मकरासन, भुजंगासन (अर्ध भुजंगासन, पूर्ण भुजंगासन, तिरीयक भुजंगासन, निराधार भुजंगासन). शलभासन, धनुरासन.

या आसनांतून पाठ, कंबर, मणके यांतील स्नायू बळकट करण्यास मदत होऊन त्रास कमी होतो. संबंधित व्याधीदेखील दूर होतात.
मानसिक स्वास्थ्यासाठी - निराशा, ताण-तणाव इत्यादी मानसिक व्याधी दूर करण्यासाठी अनुलोम, विलोम उपयोगी ठरतो. याद्वारे मेंदूपर्यंत रक्‍तपुरवठा होण्यास मदत होते. रक्‍ताभिसरण सुधारते. भ्रामरी, उदगिद, प्रणवचे ध्यान या योगाभ्यासाचाही उपयोग होतो.

योग ही जीवनपद्धती आहे. आसन हा त्याचाच भाग आहे. योगामध्ये आहार, विहारासह निसर्गाशी मिळते-जुळते जगण्याची संधी मिळते. शरीर, मन आणि आत्मा यामध्ये सकारात्मक परिणाम घडविण्यासाठी योग उपयोगी ठरतो. स्पर्धेच्या आजच्या काळात निरोगी, आनंदी जीवन जगण्यासाठी योगाची जीवनपद्धती आत्मसात करायला हवी.
- गंधार मंडलिक, संचालक, (इंटरनॅशनल कोर्स), योग विद्या गुरूकुल.

विविध व्याधींनुसार योगक्रिया केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. दिवसांतून काही वेळ योगाभ्यासासाठी दिल्यास उर्वरित दिवस उत्साहवर्धक करता येऊ शकतो. प्रत्येकाने योगसाधना करत जगण्यातील आनंद वाढवला पाहिजे.
- मोहन चकोर, जिल्हा योग विस्तारक, पतंजली योगपीठ

Web Title: nashik news globla yoga day