17 जागांसाठी 63 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

एकलहरे - ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह 17 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी मतदान संपेपर्यंत 63.19 टक्के मतदान झाले. प्रथमच जनतेमधून निवडले जाणार असल्यामुळे कोणत्या पॅनलला सरपंचपद मिळते, याबाबत सगळ्यांच्या नजरा आज (ता. 27) होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. 

एकलहरे - ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह 17 जागांसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी मतदान संपेपर्यंत 63.19 टक्के मतदान झाले. प्रथमच जनतेमधून निवडले जाणार असल्यामुळे कोणत्या पॅनलला सरपंचपद मिळते, याबाबत सगळ्यांच्या नजरा आज (ता. 27) होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. 

सकाळी सातला मतदानाला प्रारंभ झाला. मतदारांची गर्दी सकाळी दहानंतर दिसून आली. एकलहरे कॉलनीत एक मतदान केंद्र, तर दुसरे केंद्र एकलहरा गावात जिल्हा परिषद शाळेत होते. सकाळपासूनच ग्रामविकास पॅनल व परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार मतदान केंद्राच्या बाहेर उभे होते. दुपारपर्यंत 40 टक्के मतदान झाले. 

प्रभाग एकमध्ये दोन हजार 626 पैकी एक हजार 741, प्रभाग दोनमध्ये 893 पैकी 476, प्रभाग तीनमध्ये एक हजार 130 पैकी 685, प्रभाग चारमध्ये एकलहरा गावातील मतदान केंद्रावर एक हजार 356 पैकी एक हजार 57 नागरिकांनी मतदान केले. प्रभाग पाचमध्ये 849 पैकी 367, प्रभाग सहामध्ये 615 पैकी 394 अशा सात हजार 469 पैकी चार हजार 720 मतदारांनी हक्क बजावला. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस निरीक्षक, पाच सहाय्यक पोलिस निरीक्षक, 22 कर्मचारी, दोन महिला कर्मचारी व आठ होमगार्ड असा चोख बंदोबस्त ठेवला होता. नाशिक येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. 

अनेक मतदार वंचित 
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नागरिकांची नावेच मतदारयादीत सापडली नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. दुसरीकडे मतदारयाद्यांमध्ये अनेक घोळ असल्यामुळे नागरिकांना मतदान केंद्र नेमके कोणत्या ठिकाणी आहे, हे शोधण्यासाठी धावपळ झाली. 

मतदान दृष्टिक्षेपात 
-बूथवर भावी मतदारयाद्यांमध्ये नावे शोधण्याचे काम करीत होते. 
-दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या उमेदवारांना अंतिम टप्प्यात पावसाने झोडपले. 
-वसाहतीबाहेर स्थलांतरित झालेल्या मतदारांना वाहनांमधून आणले जात होते. 
-आजच्या मतदानात ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. 

Web Title: nashik news gram panchayat election