राज्यातील द्राक्षशेतीला शंभर कोटींचा फटका

ज्ञानेश उगले
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नाशिक : दिवाळीपूर्वी सलग ९ दिवसांच्या पावसाने राज्यातील द्राक्षशेतीचे अतोनात नुकसान केले. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे विभागातील ४ लाख एकरांपैकी निम्मी म्हणजे २ लाख एकरांवरील द्राक्षशेती फळकूज व डाउनीच्या कचाट्यात सापडली आहे. घड कुजून गेल्याने यातील ५० हजार एकरांवरील द्राक्षपिक तर शंभर टक्के हातातून गेले आहे. द्राक्षाच्या पीक संरक्षणातील ८० टक्के खर्च हा फळ छाटणीच्या पहिल्या महिन्यात होतो. मणी धारणेपर्यंत एकरी किमान २ लाख रुपये खर्च होतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. यानुसार द्राक्ष उत्पादकांचा १०० कोटींपेक्षा जास्त खर्च अवकाळीमुळे वाया गेला आहे.

दोन चार दिवसांपुरता पाऊस असता तर त्यावर नियंत्रण करणे आवाक्‍यात होते. मात्र, ऑक्‍टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यांत सलग ९ दिवस पाऊस रोज धो धो कोसळत होता. बहुतांश बागांतून अनेक दिवस पाणी वाहत होते.  

अर्लीचे मोठे नुकसान
नाशिक, पुणे विभागात बहराची अर्ली छाटणी घेण्याकडे कल राहिला आहे. नाशिक भागातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात तर पुणे विभागातील बोरी, इंदापूर भागातील द्राक्ष पक्वतेच्या टप्प्यात असताना पावसाने झोडपले. काढणीच्या अवस्थेतील बागांवर डाउनीचा प्रादुर्भाव वाढला. पुढे डाउनी नियंत्रणाबाहेर गेल्याने हातातोंडाशी आलेले पीक सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. दरम्यान, नाशिक व सांगली भागात सप्टेंबर महिन्यात विशेषत: ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या काळात फळ छाटणी झालेल्या बागा या पोंगा ते फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाच्या तडाख्यात सापडल्या. दररोज पाऊस पडत असतानाही चिखलगाळाची पर्वा न करता पीक वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी प्रयत्नांची शर्थ केली. पाऊस थांबून थंडी सुरू झाली आहे. याच वेळी वेलीवरील घड कुजून गेले असून फुलोरा गळून गेला आहे. नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे या द्राक्ष उत्पादक पट्ट्यात सरासरी २५ टक्के बागांचे म्हणजे किमान ५० हजार एकरांवरील द्राक्षांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचा वर्षभराचा १ लाखापासून ते २ लाखांपर्यंतचा खर्च वाया गेला आहे.

एकूण १२ एकरांपैकी ४ एकर फळकुजीने पूर्ण गेलंय. ६ एकर पोंगा अवस्थेत होतं तेही संपलंय. कारण त्यातून पाणीच वाहत होतं. वाचलेल्या बागेतील बहरातही जोम दिसत नाहीय. यंदा हे सगळंच हातातून गेलं असलं तरीही खर्च करावाच लागणार आहे. त्यावरच पुढील वर्षीचं उत्पादन अवलंबून आहे.
- राजू गायकर, निमगाव, ता. निफाड, जि. नाशिक 

माझं ६ एकर क्षेत्र अंतिम टप्प्यात हातातून गेलंय. बहर येऊनही पावसात बाग सापडली. फळकुजीने बाग बहराशिवाय उभी आहे.
- ज्ञानेश्‍वर कातकाडे, गिरणारे, ता. जि. नाशिक 

इलेक्‍ट्रोस्टॅटिक मशिन भाडेतत्त्वावर देण्याचा माझा व्यवसाय आहे. त्याचा वापर जीए फवारणीसाठी केला जातो. मात्र, मागील चार दिवस फळकूज नियंत्रणासाठी त्याचा वापर करीत होतो. बागेत चिखल गाळ असल्याने त्याचा फटका बसला.
- अशोक पाटील, सोनजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक

अवकाळी पावसाने यंदा पहिल्यांदा द्राक्षशेतीला मोठाच दणका दिलाय. अर्ली आणि सप्टेंबरमधील छाटणी काळातील बागांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाया गेला. नाशिक विभागात नुकसान सर्वाधिक आहे.
- सुभाष आर्वे, अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे.

Web Title: nashik news Grape farming