द्राक्ष-वाइन महोत्सवाने ‘ॲग्रो टुरिझम’ला चालना

सोमवार, 29 जानेवारी 2018

नाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकमध्ये वर्षाला एक ते सव्वा कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. सोलापूर, सांगली, पुण्यासह इतर भागांत याव्यतिरिक्त पन्नास लाख ते पाऊण कोटी वाइनचे उत्पादन होते. भारतीय चवीची वाइन ही स्वदेशी जगभर ओळख निर्माण करण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून वायनरी वाटचाल करत असताना या उद्योगाने निर्मितीबरोबर निर्यातवृद्धी १० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यात यश मिळवले. ‘ॲग्रो टुरिझम’ला ‘बूस्ट’ मिळावा म्हणून द्राक्ष-वाइन महोत्सवाची मांदियाळी असेल.

नाशिक - वाइन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकमध्ये वर्षाला एक ते सव्वा कोटी लिटर वाइनची निर्मिती होते. सोलापूर, सांगली, पुण्यासह इतर भागांत याव्यतिरिक्त पन्नास लाख ते पाऊण कोटी वाइनचे उत्पादन होते. भारतीय चवीची वाइन ही स्वदेशी जगभर ओळख निर्माण करण्याचे आव्हान डोळ्यांपुढे ठेवून वायनरी वाटचाल करत असताना या उद्योगाने निर्मितीबरोबर निर्यातवृद्धी १० टक्‍क्‍यांपर्यंत नेण्यात यश मिळवले. ‘ॲग्रो टुरिझम’ला ‘बूस्ट’ मिळावा म्हणून द्राक्ष-वाइन महोत्सवाची मांदियाळी असेल.

सुला विनियार्डस्‌तर्फे परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून ‘ॲग्रो टुरिझम’ची बरकत साधण्यासाठी दरवर्षी ‘सुला फेस्ट’ हा संगीत महोत्सव नाशिकमध्ये होतो. ३ आणि ४ फेब्रुवारीला हा महोत्सव होत आहे. यंदाच्या महोत्सवासाठी बारा हजार परदेशी पर्यटक अपेक्षित आहेत. इंग्लंड, नेदरलॅंड, अमेरिका, रशिया, डेन्मार्क, ऑस्ट्रियामधील पर्यटकांनी त्यासाठी नोंदणी केलीय. नेदरलॅंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोलॅंड लेप्रेब्रे हा महोत्सवाचे आकर्षण असेल. सुलातर्फे २८ देशांमध्ये वाइनची निर्यात केली जाते. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जपान, सिंगापूर, रशिया या प्रमुख देशांचा समावेश आहे.

‘नाशिक व्हॅली’ ब्रॅंडसाठी महोत्सव
नाशिक व्हॅली वाइन क्‍लष्टर, इंडिया ग्रेप हार्वेस्ट आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून नाशिकमध्ये इंडिया ग्रेप हार्वेस्ट २०१८ हा द्राक्ष-वाइन महोत्सव पुढील महिन्यात होतोय. महोत्सवासाठी १ फेब्रुवारीपासून विंचूर वाइन पार्क आणि वैतरणा धरणाच्या पाण्याजवळील व्हॅल्यून विनियार्ड या ठिकाणी तंबूची उभारणी केली जाणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने जपानमधील पर्यटक दाखल झाले आहेत. कोरिया, जर्मन, फ्रान्समधील पर्यटकांच्या जोडीलाच विविध राष्ट्रांच्या वाणिज्य दूतावासाच्या वरिष्ठांचे हा महोत्सव आकर्षण ठरणार आहे. महोत्सव ९ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार बहरणार आहे. सह्याद्री फार्ममध्ये ९ फेब्रुवारीला होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याच्या निमित्ताने द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा होईल. द्राक्षांचे प्रदर्शन, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम असे स्वरूप उद्‌घाटनानिमित्त असेल. ११ मार्चला ग्रेप कार्निव्हलचे औचित्य साधून नाशिक शहरातून ‘रोड-शो’ होईल. दरम्यान, सोमा वाइनतर्फे अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या १० हजार लिटर वाइनला एका बाटलीसाठी तीन ते साडेतीन डॉलरइतका भाव मिळाला आहे. लंडनमध्ये ही वाइन लवकर पाठवण्यात येणार आहे. याशिवाय आफ्रिकन देश आणि जपानमध्ये वाइन पाठवण्यासाठी बोलणी सुरू आहे.

पाच लाख परदेशी पर्यटकांचे उद्दिष्ट
अत्याधुनिक शेती, फलोत्पादनातील क्रांती आणि वाइन उद्योग अशी जगाच्या नकाश्‍यावर आपली ओळख निश्‍चित करणाऱ्या नाशिकमध्ये वर्षाला सर्वसाधारपणे दोन लाख पर्यटक येतात. द्राक्ष-वाइन महोत्सवाच्या माध्यमातून वर्षाला ५ लाखांपर्यंत परदेशी पर्यटक यावेत हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. याशिवाय शेती उत्पादनातील नाशिक ब्रॅंड विकसित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. 

सुला विनियार्डस्‌च्या माध्यमातून भारतीय वाइनची चव जगातील ग्राहकांच्या जिभेवर रुळावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. व्यावसायिकदृष्ट्या हे प्रयत्न करत असतानाच अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर वाढवण्यात येत आहे. त्याच वेळी स्थानिकांच्या विकासाला हातभार लावण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.
- मोनीत ढवळे  (सुला विनियार्डस्‌)

राज्यातंर्गत करप्रणालीच्या विविध असलेल्या धोरणामुळे वाइन विक्री व्यवस्थेत अडथळा उभा राहिला आहे. त्याबद्दल सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. द्राक्ष आणि वाइन महोत्सवाच्या अनुषंगाने शेतीविषयक उत्पादने ‘नाशिक व्हॅली’ या ब्रॅंड अंतर्गत विक्रीची व्यवस्था उभी राहावी हा उद्देश डोळ्यांपुढे ठेवण्यात आला आहे.
- जगदीश होळकर  (अध्यक्ष, इंडिया ग्रेप हार्वेस्ट असोसिएशन)

Web Title: nashik news Grape Tourism grape wine festival