‘जीएसटी’ अनुदानाचे ७३ कोटी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

सर्वाधिक अनुदान मुंबईला
नाशिक, मालेगावसह २६ महापालिकांसाठी मासिक जीएसटी अनुदान जाहीर करण्यात आले. सर्वाधिक अनुदान बृहन्मुंबई महापालिकेसाठी ६४७ कोटी ३४ लाख, पुणे १३७ कोटी ३० लाख, नाशिक ७३ कोटी ४० लाख रुपये वाटप करण्यात आले. यात नाशिक तिसऱ्या स्थानी आहे.

नाशिक - राज्यात ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर महापालिकेला निधी प्राप्त होईल की नाही, याबाबत निर्माण झालेले संशयाचे ढग दूर झाले आहेत. शासनाने पाच तारखेच्या आत महापालिकेचे अनुदान देण्याचा दिलेला शब्द पाळला आहे. आज ७३ कोटी ४० लाख रुपये तिजोरीत जमा झाले. मालेगाव महापालिकेला मासिक ११ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलासा मिळाला आहे.

महापालिकेत २०१२ पूर्वी जकात कर लागू होता. त्यातून वार्षिक ७०० ते ७५० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत होते. त्यानंतर ‘एलबीटी’ लागू झाला. त्यात छोट्यातला छोटा व्यापारी एलबीटी कराच्या जाळ्यात आल्याने त्याविरोधात मोठे आंदोलन झाले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर युतीचे सरकार आले. सरकारने एलबीटी वसुली बंद करून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक महापालिकेला शासनाकडून सुमारे ३५ कोटी रुपये अनुदान प्राप्त होत होते. ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांकडूनही तेवढेच म्हणजे ३५ कोटी रुपये प्राप्त होत होते. ‘एलबीटी’तील तूट भरून काढण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावला होता. त्यातून महिन्याला चार कोटी; तर वार्षिक ५० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न तिजोरीत जमा होत होते. महापालिकेचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असलेल्या ‘एलबीटी’त दरवर्षी दहा टक्के वाढ करून उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्‍चित केले जात होते.

यंदा ‘एलबीटी’तून ८१० कोटींचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. एप्रिल, मे व जूनचे शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान महापालिकेला मिळाले. एक जुलैनंतर ‘जीएसटी’ लागू केल्याने शासनाचे धोरण निश्‍चित नव्हते; परंतु आज शासनाने नाशिक महापालिकेसाठी ७३ कोटी ४० लाख रुपयांचे, तर मालेगाव महापालिकेसाठी ११ कोटी ६८ लाख रुपयांचे जीएसटी अनुदान जाहीर करीत ती रक्कम वर्ग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Web Title: nashik news GST