नाशिक - राष्ट्रीय दिव्यांग साहित्य संमेलन 24 व 25 फेब्रुवारी 2018ला नाशिकमध्ये होणार आहे. संमेलनाच्या पूर्वतयारीची बैठक येत्या रविवारी (ता. 24) होणार आहे, अशी माहिती सुनील रुणवाल आणि पांडुरंग भोर यांनी दिली.
रुणवाल म्हणाले, की पूर्वतयारी बैठकीत संमेलनाच्या स्थानिक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होईल. संयोजन, स्वागत अशा विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. शिवाय दोनदिवसीय संमेलनातील विषय व वक्ते याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात येणार आहे. यापूर्वी सातारा, वसई, कऱ्हाड, पुणे, आळंदी व औरंगाबादमध्ये संमेलने झाली आहेत. आतापर्यंत झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रा. पुरुषोत्तम महाजन, ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट, सोनाली नवागूळ, प्रा. प्रेम सिंग, अशोकराव थोरात यांना मिळालेला आहे.
यापूर्वीच्या संमेलनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार बच्चू कडू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, भाई वैद्य, वीणा गव्हाणकर, फ. मुं. शिंदे, सदानंद मोरे, रा. रं. बोराडे आदींनी मार्गदर्शन केलेले आहे.
|