जुने नाशिकमध्ये रोगराईला आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

कचराकुंड्यांची ठिकाणे
फुले मार्केट घासबाजार शाळेसमोर
सुमन नाईक शाळा  खडकाळी जीन मंझील
अमरधाम रोड नानावली शाळेजवळ
सरस्वती नाला परिसर
भीमवाडी   पंचशीलनगर 

जुने नाशिक - जुने नाशिक परिसरातील कचऱ्याची वाढती समस्या, त्यात पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले असून, त्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. 

काही दिवसांपासून शहरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी तळे साचून डासांची उत्पत्ती वाढत आहे. त्यात जुने नाशिकमधील कचऱ्यांची समस्या ‘जैसे थे’ आहे. येथील विविध भागात असलेल्या कचराकुंड्यांकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. पावसाचे पाणी या कचऱ्यावर पडून कचरा कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे साथींच्या आजारांत वाढ होत आहे. पाणी साचल्यामुळे डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती वाढली आहे. परिसरात प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी, कचऱ्याकुड्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने समस्यांत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. फुले मार्केट व कथडा भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. मोकाट जनावरे कचराकुंड्यांवर येतात. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

नगरसेवकांचा हद्दीचा वाद 
महापालिका निवडणुकीत चार नगरसेवक मिळून प्रभाग झाला. चार नगरसेवकांनी आपली कामाची हद्द ठरवून घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. काही काम किंवा आरोग्याच्या समस्या घेऊन एका नगरसेवकाकडे गेल्यास त्यांच्याकडून प्रथम भाग कुठला आहे, त्याची खात्री केली जाते. दुसऱ्या नगरसेवकाच्या हद्दीतील असेल तर त्याला त्या नगरसेवकाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे नागरिकांवर एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे पायपीट करण्याची वेळ आली आहे.

Web Title: nashik news health