आरोग्यसेवा सलाइनवर;स्वच्छतेचे वाजले तीन तेरा

आरोग्यसेवा सलाइनवर;स्वच्छतेचे वाजले तीन तेरा

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूर व मानूर ही गोदाकाठची समृद्ध गावे आहेत. महापालिकेच्या स्थापनेनंतर आपल्याही गावाचा त्यात समावेश व्हावा, जेणेकरून गावात शहरीकरणाच्या खुणा दिसतील, अशी इतर गावांप्रमाणेच ग्रामस्थांची भाबडी आशा होती. मात्र, महापालिकेतील समावेशानंतरच्या तब्बल पंचवीस वर्षांनंतरही नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने कोणतेही पाऊल न उचलल्याने नांदूर-मानूरच्या इतर समस्यांबरोबरच नागरिकांचे आरोग्य सलाइनवरच असल्याचे दिसून येते. येथील स्वच्छतेच्या प्रश्‍नांबाबत कुणी बोलायलाच नको. अस्वच्छतेने सर्वांनाच ग्रासले आहे. 

केंद्र सरकारकडून देशातील इतर काही प्रमुख शहरांप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यात नाशिकचाही स्मार्टसिटी प्रकल्पात समावेश झाला आहे. त्यामुळे शहरासह महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचे गावपण जाऊन आपणही विकासाच्या गंगेत सहभागी होऊ, अशी येथील गावकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, येथे फक्त महापालिकेची शाळा तिही फक्त दहावीपर्यंतच कार्यरत असल्याने  विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी सहा किलोमीटरवरील नाशिक किंवा नाशिक रोडलाच जावे लागते. याशिवाय अनियमित येणाऱ्या घंटागाडीबरोबरच दोन्ही गावांत नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचे प्राबल्य वाढले आहे.

मखमलाबाद, म्हसरूळ व आडगावकरांप्रमाणेच नांदूर-मानूरमध्ये महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय नाही. येथील रहिवाशांना किरकोळ ताप आला तरी उपचारासाठी शहरातच यावे लागते. नाही म्हणायला... आडगावच्या ग्रामस्थांसाठी मविप्रचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल अल्प किमतीत सुविधा देते. त्यामुळे आडगावकरांचा आरोग्याचा प्रश्‍न काही प्रमाणात मिटला आहे. पण, नांदूर-मानूरसाठी स्वतंत्र्य रुग्णालय नसल्याने येथील नागरिकांना खासगी रुग्णालयांवरच भिस्त ठेवावी लागते. 

जास्त अंतरामुळे रहिवासीयांना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय किंवा नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय असे दोनच पर्याय शिल्लक राहतात. दोन्ही गावांत कष्टकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या अनुषंगाने या भागात महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय असावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकून दिला जातो. 

या भागात गोदावरीत मोठ्या प्रमाणावर गटारी मिसळत असल्याने गोदेच्या पाण्यातही मोठ्या प्रमाणावर फेस दिसून येतो. दोन्ही गावांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. यातील नांदूर गावाच्या स्मशानभूमीचा रस्ता सुस्थितीत आहे. पण मानूरच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालणे कठीण असल्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. मानूर स्मशानभूमीच्या आवारातच बांधकामाचे उर्वरित साहित्य आणून टाकण्यात आले आहे.

नांदूर-मानूरसाठी महापालिकेचा स्वतंत्र दवाखाना नाही. पूर्वी दर बुधवारी महापालिकेतर्फे मंदिरासमोर मोफत औषधांचे वाटप होत असे. आता त्यासाठी दहा रुपयांचा केसपेपर काढावा लागतो. नांदूर-मानूरसाठी महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय असावे.
- किशोर दिंडे, रहिवासी

गावातील ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची मुले दूरवरील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. मात्र बहुसंख्य कष्टकऱ्यांच्या मुलांना महापालिकेच्या शिक्षणावरच अवलंबून राहावे लागते.
- जनार्दन मगर, रहिवासी

नांदूर-मानूर दोन्ही गावांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबीयांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना आरोग्याच्या किरकोळ समस्यांसाठीही नाशिक किंवा नाशिक रोडला जावे लागते. या ठिकाणी महापालिका रुग्णालयाची सोय झाल्यास आरोग्याचा प्रश्‍न सुटेल. नळाला स्वच्छ पाणी यावे.
- अमित दिंडे, रहिवासी

मानूरकडून नांदूरगावाकडे येणाऱ्या रस्त्यावर तीव्र चढ-उतार आहेत. वर्दळ कमी असल्याने या भागात सर्वच वाहने जोरात चालत असल्याने लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी जुनी मागणी आहे.
- दीपक वाघ, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com