आरोग्य विभाग व ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

सिडको - गेल्या काही दिवसांपासून सिडको व अंबड परिसरात वाढलेल्या डासांचे निर्मूलन करण्यात आरोग्य विभाग व ठेकेदार अपयशी ठरल्याने पेस्ट कंट्रोल ठेकेदाराचा ठेका रद्द करून कारवाई करावी. तसेच नागरिकांच्या मृत्यूस कारणभूत ठरवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर व किरण गामणे-दराडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

श्री. दातीर म्हणाले की, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासांचे निर्मूलन करण्यासाठी पेस्ट कंट्रोल ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. त्यासाठी ठेकेदाराला मोठ्या प्रमाणात देयके अदा केले आहेत. पण सिडकोत पेस्ट कंट्रोलचे काम करताना ठेकेदार आढळून येत नाही. त्यामुळे डेंगूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मागील महासभेत सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी केली होती. काहींचे आर्थिक हितसंबध असल्याचा आम्हाला संशय आहे. त्यामुळे काहीच कारवाई होत नाही.

गामणे म्हणाल्या की, परिसरातील सुमारे १५ नागरिकांचा डेंगीसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. सुमारे पाचशे नागरिकांना या रोगाची लागण झालेली आहे. तरीही महापालिकेची यंत्रणा सुस्त असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पेस्ट कंट्रोल मक्तेदारावर कारवाई करून त्याचा ठेका रद्दा करावा. तसेच त्याला काळ्या यादीत टाकून या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार धरून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्तांनाही दिलेले आहे.

सिडको व अंबड परिसरात डेंगीने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये अनेकांवर उपचार सुरू आहेत, मात्र प्रशासकीय यंत्रणा काहीच हालचाल करीत नाही. त्यामुळे नागरिकांसह नगरसेवकही त्रस्त झालेले आहेत. परिसरात स्वच्छता होत नसल्याने कचरा व घाण पडलेली आहे. घंटागाडीच्या ठेकेदारावर कारवाई करण्याच्या ठराव प्रभाग सभेत होऊनही काहीच कार्यवाही न झाल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली.

Web Title: nashik news health crime against humanity