अवघ्या 78 मिनिटांत हृदय नाशिकहून पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांची वर्षानुवर्षाच्या त्रासातून सुटका होऊ शकते.
- डॉ. भाऊसाहेब मोरे (संचालक हृषीकेश हॉस्पिटल)

अवयवदानासाठी प्रथमच "एअर ग्रीन कॉरिडॉर'; सात रुग्णांना जीवदान
नाशिक - मेंदू मृत (ब्रेनडेड) झालेल्या रुग्णाचे हृदय गुरुवारी सकाळी चार्टर विमानाने "एअर ग्रीन कॉरिडॉर'ने 78 मिनिटांत पुण्याला पाठविण्यात आले. नाशिकमधील संबंधित रुग्णाच्या अवयवदानामुळे सात जणांहून अधिक जणांना जीवदान मिळाले. नाशिकमधून पहिल्यांदाच विमानाने "एअर ग्रीन कॉरिडॉर' करण्यात आला.

जेलरोड येथे राहणाऱ्या अश्‍विन रावसाहेब झळके (वय 35) यांचा चार जुलै रोजी अपघात झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना सुविचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यांना तपासून त्यांचा मेंदू मृत झाला असल्याचे सांगितले. या वेळी झळके यांची पत्नी व नातेवाइकांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हृषीकेश रुग्णालयाशी संपर्क साधला. डॉ. संजय रकिबे यांनी झळके यांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. डॉक्‍टरांनी त्यांचे हदय, डोळे, मूत्रपिंड, यकृत, त्वचा आदी अवयव काढून घेतले.

पुणे येथील रुबी हॉस्पिटलमधील रुग्णास हृदयाची आवश्‍यकता होती. चार तासांच्या आत हृदयाचे प्रत्यारोपण होणे गरजेचे असल्याने झळके यांचे हृदय सकाळी "ग्रीन कॉरिडॉर'तर्फे ओझर येथील विमानतळ व तेथून चार्टड विमानाने पुणे विमानतळ व तेथून "रुबी'त पोचविण्यात आले. या सर्व प्रवासाला अवघा 78 मिनिटांचा अवधी लागला. यानंतर यकृत व एक मूत्रपिंडही पुण्यातील अन्य रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले.

सर्वांचेच प्रयत्न यशस्वी
अश्‍विन झळके यांच्या अवयवदानामुळे चार लोकांना जीवदान, तर तीन लोकांना चांगले आयुष्य मिळाले आहे. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक डॉक्‍टरांनी केले आहे. डॉ. प्रीतम अहिरराव, डॉ. अनिरुद्ध चिमुटे, डॉ. किशोर बाफना, चंद्रकांत हुशार यांच्यासह नाशिक, नगर, आणि पुणे जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी "ग्रीन कॉरिडॉर' यशस्वी झाला.

Web Title: nashik news heartnashik to pune in 78 minit