वडाळ्याच्या अनधिकृत भंगार बाजारप्रश्‍नी संरक्षण विभागाशी करणार पत्रव्यवहार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नाशिक - वडाळा गावातील अर्टिलरी सेंटरच्या भिंतीलगत वसलेला अनधिकृत भंगार बाजार संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने येथून दहशतवादी कारवाया होऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षणाचा विचार करून तातडीने संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक - वडाळा गावातील अर्टिलरी सेंटरच्या भिंतीलगत वसलेला अनधिकृत भंगार बाजार संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने येथून दहशतवादी कारवाया होऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षणाचा विचार करून तातडीने संरक्षण विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

सातपूर-अंबड रस्त्यावरील चुंचाळे शिवारातील भंगार बाजार हटविल्यानंतर तेथील काही भंगाराचे गोडावून वडाळा गावाच्या मागच्या बाजूला फैलावत आहे. अर्टिलरी सेंटरच्या भिंतीला लागून भंगाराचे गोडावून उभे राहत असल्याने येथील संरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतच्या समस्येवर ‘सकाळ’ने प्रकाशझोत टाकला होता. अर्टिलरी भिंतीच्या पलीकडे मिलिटरीचे संरक्षणविषयक उपक्रम सुरू असतात. बोफोर्स व हेलिकॉप्टरचे गोडावून, एरोड्रम, धावपट्टी, हेलिपॅड या भागात आहे. त्यामुळे भविष्यात दहशतवादी घटनाही घडू शकतात. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने सूक्ष्म विचार करण्याची आवश्‍यकता असताना त्याउलट भंगार बाजाराचे गोडावून येथे स्थापन होऊ लागल्याने ती चिंतेची बाब ठरत आहे.

आरोग्याच्या प्रश्‍नाने येथे तोंड वर काढले आहे. जमा झालेले प्लास्टिक रात्री जाळण्याचे प्रकार होतात. त्यामुळे परिसरात उग्र वास सुटतो. यासंदर्भात ‘सकाळ’ने आवाज उठविल्यानंतर स्थानिकांकडून भंगार बाजार हटविण्याच्या मागणीला जोर चढला आहे. महापालिकेने तातडीने ऐंशी भंगार व्यावसायिकांना नोटिसा पाठवले आहे.

अर्टिलरी सेंटरच्या भिंतीलगत भंगाराचे अनधिकृत तयार होणारे गोडावून सुरक्षिततेला धोका पोचविणारे आहेत. त्यामुळे अर्टिलरी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दिल्लीत संरक्षण विभागाशी चर्चा करणार असून, कारवाई न झाल्यास संसदेत याविषयावर चर्चा घडवून आणणार आहे.
- हेमंत गोडसे, खासदार

Web Title: nashik news hemant godse information