हेमलता पाटलांकडून उद्यान विभागाला टाळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 डिसेंबर 2017

नाशिक - महापालिकेच्या उद्यान विभागाला कोणीच वाली नसल्याने उद्यानांची दुरवस्था होत असून, वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीतील अपयश व अनागोंदी कारभाराविरोधात आज काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस व पश्‍चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी महापालिका मुख्यालयातील उद्यान विभागाला टाळे लावून निषेध केला.

शहरात ४८९ उद्याने आहेत. त्यातील २८९ उद्यानांची देखभाल खासगी ठेकेदारांकडून होते. ११९ उद्यानांची महापालिकेतर्फे देखभाल-दुरुस्ती होते. उद्यान विभागात २१६ कर्मचारी आहेत. ४८९ उद्यानांचा विचार करता मनुष्यबळ अपुरे आहे. सहा विभागांसाठी एकच उद्यान निरीक्षक आहे. पाच पदे रिक्त आहेत. उद्यान विभागाचा कार्यभार प्रभारी व्यक्तीकडे आहे. सद्यःस्थितीत दोन उद्यान निरीक्षक, चार प्रभारी उद्यान निरीक्षक, सहा लिपिक, तीन शिपाई, सहा हेडमाळी, २३ माळी, १५० बिगारी, १२ वॉचमन व पाच वाहनचालक असा अपुरा कर्मचारी वर्ग आहे. ठेकेदारांना देखभाल व दुरुस्तीसाठी दिलेल्या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. वाहतूक बेटे, पुतळ्यांभोवतीचे सुशोभीकरण, दुभाजक, कारंजांची दुरवस्था होऊनही उद्यानांकडे लक्ष दिले जात नाही. नगरसेवकांनी तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नाही, त्या निषेधार्थ डॉ. पाटील यांनी उद्यान विभागाला टाळे ठोकले. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे चावी सुपूर्द करत उद्यान विभागातील मागण्या मांडल्या. 

माध्यमांशी बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या, की नाशिकची ओळख एके काळी गुलशनाबाद होती; परंतु महापालिकेतील उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे शहर भकास बनले आहे.

Web Title: nashik news hemlata patil garden department