बंदी असतानाही देवळे पुलावरून अवजड वाहतूक सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

इगतपुरी - सर्वाधिक वर्दळ असलेल्या घोटी-सिन्नर महामार्गावरील देवळे येथील पूल कमकुवत झाला असून, मागील महिन्यात पुलाला भगदाड पडले. यामुळे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद केली असली, तरी ती सुरूच आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे.

घोटीपासून शिर्डी, सिन्नर, भंडारदरा, अकोले व पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेल्या रस्त्यावरील देवळे येथील पुलाचा मलबा कोसळून भगदाड पडले होते. दुरुस्तीसाठी पुलावरील सर्व वाहतूक दहा दिवसांसाठी बंद करण्यात आली होती. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर हलक्‍या वाहनांची वाहतूक सुरू करून अवजड वाहनांना बंदी केली होती.

पुलावरून अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून सुरवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरेपूर दक्षता घेतली. पुलाच्या दोन्ही बाजूला कर्मचारी नेमून अवजड वाहने पुलावर येणार नाहीत, यासाठी लोखंडी कमान उभी केली होती. सध्या बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. पुलावरून बसगाड्यांची वाहतूक बंद असून, अवजड वाहने पुलावरून गेल्यास हादरे बसताहेत. ही वाहतूक सुरूच राहिली, तर पूल कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. ही वाहतूक बंद करावी, अशी मागणी होत आहे.

दुरुस्तीकामही अर्धवटच 
पुलाला भगदाड पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, पुलावरील भगदाड बुजविण्याचे आणि लोखंडी बेअरिंग टाकण्यापलीकडे कोणतेही ठोस काम करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, दुरुस्तीचे कामही अर्धवट आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुलाची स्थिती ‘जैसे थे’ आहे.

Web Title: nashik news hevay vehicle bridge