रांगेत उभे राहूनच रुग्ण अर्धमेले 

रांगेत उभे राहूनच रुग्ण अर्धमेले 

सिडको - कामगार व कष्टकऱ्यांसाठी सुरू केलेल्या मोरवाडीच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे रुग्णांची गर्दी झाल्यावर उभे राहायलासुद्धा जागा मिळत नाही. तपासणीच्या दोन दिवशी रांग इतकी मोठी असते, की नंबर येईपर्यंत रुग्ण थकतात. कमी कर्मचारी असल्याने त्यातही डॉक्‍टरांची वेळ संपली की ते निघून गेल्यानंतर रुग्णांना वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. एकूणच सोयीऐवजी गैरसोयीच जास्त, असे या रुग्णालयाबाबत म्हणण्याची वेळ आली आहे. 

सिडको, मोरवाडी, अंबड, कामटवाडे, या व इतर सुमारे चार लाख लोकसंख्येसाठी महापालिकेने रुग्णालय सुरू केले. त्यात सर्वसामान्य कुटुंबांचे प्रमाण जास्त असल्याने रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. त्यामानाने सोयी-सुविधांची मात्र वानवा आहे. सकाळी आठपासूनच रुग्णालयात नंबर लावण्यासाठी रुग्णांची सुरवात होते. केसपेपर काढून झाल्यानंतर डॉक्‍टरांची वाट पाहावी लागते. डॉक्‍टर त्यांच्या सोयीनुसार कधी अर्धा तास उशिरा, तर कधी एक तासाने येतात. पण तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन केल्याशिवाय रुग्णांना पर्याय नसतो. खासगी दवाखाने परवडत नाहीत. रोजंदारी बुडवून उपचार करण्यासाठी थांबावे लागते. गरोदर महिलांना उपचारासाठी केसपेपरची गरज नाही, असा फलक लावलेला असताना प्रत्यक्षात त्यांनाही केसपेपर काढावाच लागतो, असे रुग्णांनी सांगितले. रात्री डॉक्‍टर उपलब्ध नसतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठविले जाते. पन्नास बेडचे रुग्णालय, त्यामानाने कर्मचारी संख्या फारच तोकडी आहे. डॉक्‍टरही कमी आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी येथे भेट दिली. त्या वेळी एकही डॉक्‍टर हजर नव्हता. जवळच असलेल्या पेलिकन पार्कच्या जागेत प्रशस्त इमारत बांधून रुग्णालयाच्या जागेचा प्रश्‍न सोडविता येईल. 

वास्तव दृष्टिक्षेपात 
- अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांचे हाल 
- प्रसूतीच्या वेळी डॉक्‍टर हजर नसतात 
- जागा कमी आणि इमारतही लहान 
- प्रसूतीचे प्रमाण वाढूनही बाळांसाठी पेट्या नाहीत 
- आरोग्यसेवा असतानाही सगळीकडे घाणच घाण 
- महिला रुग्णांची संख्या जास्त, पण सोयी नाहीत 
- सोमवारी व गुरुवारी तपासणीसाठी लागतात रांगा 
- सोनोग्राफीची सुविधा सुरू करण्याची गरज 
- परिचारिकेकडून मिळते महिलांना वाईट वागणूक 
- रुग्णांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नाराजी 

येथे महिला मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी येतात. रात्री-बेरात्री परिचारिकाच प्रसूती करतात. गरज पडली तरच डॉक्‍टरांना बोलावले जाते. त्यामुळे महिलांमध्ये भीती आहे. गरीब व कामगार वस्ती असल्याने रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा सुरू झाली पाहिजे. तपासणीच्या दिवशी रुग्णांची गर्दी होते. त्या वेळी उभे राहायलासुद्धा जागा मिळत नाही. 
- किरण गामणे-दराडे, नगरसेविका 

रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध नसतात. बहुतांश उपचार परिचारिका करतात. त्या महिलांची हवी तशी देखभाल करीत नाहीत. रुग्णवाहिका नावालाच उभी असते. रात्री डॉक्‍टर नसतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना नाइलाजाने खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. 
- राकेश दोंदे, नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com