जीवनदायीच्या रुग्णाकडून उकळले एक लाख ६६ हजार 

जीवनदायीच्या रुग्णाकडून उकळले एक लाख ६६ हजार 

नाशिक - जीवनदायी योजनेतून अँजिओप्लास्टीसाठी आलेल्या सटाणा येथील विनोद कुमावत यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटलने एक लाख ६६ हजार रुपये उकळल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुमावत यांच्या नातेवाइकांनी झालेल्या प्रकाराबद्दल आरोग्य उपसंचालक आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर झालेल्या चुकीची कबुली देऊन शस्त्रक्रियेसाठी घेतलेली सर्व रक्कम परत करण्याची नामुष्की या हॉस्पिटलवर आली.

सटाणा येथील विनोद कुमावत १९ जुलैला दुपारी एकच्या सुमारास छातीत दुखत असल्याच्या कारणावरून वडाळा रोड परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आले होते. रात्री आठच्या सुमारास त्यांची अँजिओग्राफी केल्यानंतर त्यांच्या हृदयाची एक वाहिनी ब्लॉक असल्याचे निष्पन्न झाले. उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी कुमावत यांचे नातेवाईक वसंत बगडाणे आणि श्‍याम बगडाणे यांना रुग्णाची तत्काळ अँजिओप्लास्टी करावी लागेल, असे सांगितले. यावर बगडाणे यांनी कुमावत यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर महात्मा जोतिराव फुले जीवनदायी योजनेतून शस्त्रक्रिया करावी, अशी विनंती केली. पण जीवनदायी योजनेचे कर्मचारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेतच हजर असतात. त्यामुळे या योजनेतून तुमचे काम होणार नाही. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने तत्काळ शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगून डॉक्‍टरांनी दोन टप्प्यांत एक लाख ६६ हजार भरायला सांगितल्याचा आरोप कुमावत यांचे नातेवाईक श्‍याम बगडाणे यांनी केला.

शस्त्रक्रियेपूर्वी भरून घ्यायच्या संमती अर्जावर आम्हाला जीवनदायी योजनेचा लाभ नको, असे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी लिहून घेतल्याची बाब बगडाणे यांना खटकली. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी याबाबत मुंबईतील जीवनदायीच्या कार्यालयाकडे ऑनलाइन तक्रार केली. नंतर जीवनदायीचे नाशिकचे प्रमुख डॉ. हर्षल चौधरी आणि स्वप्नील इंगळे यांनी सह्याद्रीला भेट देऊन चौकशी केली. बगडाणे यांनी उपसंचालक लोचना घोडके आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर प्रकरण मार्गी लागले.

जीवनदायी योजनेच्या लाभासाठी पिवळी शिधापत्रिका, आधारकार्ड आणि ईटीआय नंबर घेऊन संबंधित कक्षाकडे जाऊन सर्व पूर्तता केल्यानंतर आपण या योजनेचा रुग्णाला लाभ देतो. कधी-कधी रुग्ण विदेशी टेन्ट टाकण्याचा आग्रह धरतात. जीवनदायीत विदेशी टेन्ट टाकता येत नाही. कुमावत प्रकरणात आम्ही त्यांची तक्रार मान्य करून त्यांच्याकडून शस्त्रक्रियेसाठी घेतलेले संपूर्ण एक लाख ६६ हजार रुपये त्यांना परत केले आहेत. पैसे घेताना त्यांनी याबाबत आमची आता कोणतीही तक्रार नाही, असे आम्हाला लिहून दिले आहे.
-अमित इंगळे, प्रशासन हेड, सह्याद्री हॉस्पिटल

सर्व पैसे परत करण्याचे आदेश
सह्याद्री हॉस्पिटल प्रशासन आणि जीवनदायी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हॉस्पिटलने चूक मान्य करीत शस्त्रक्रियेसाठी घेतलेले पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. हॉस्पिटल प्रशासनाने विनोद कुमावत, श्‍याम बगडाणे आणि वसंत बगडाणे यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून एक लाख ६६ हजारांचा धनादेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com