वैद्यकीय सेवेऐवजी वादाचेच केंद्र 

दत्ता जाधव
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पंचवटी - संजय गांधीनगर, वाल्मीकनगर, फुलेनगर, वडारवाडी, भराडवाडी या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची वैद्यकीय सेवेची मदार इंदिरा गांधी रुग्णालयावर अवलंबून आहे. परंतु, वैद्यकीय सेवा पुरविण्याऐवजी रुग्णालय वादाचेच केंद्र बनले आहे.

पंचवटी - संजय गांधीनगर, वाल्मीकनगर, फुलेनगर, वडारवाडी, भराडवाडी या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची वैद्यकीय सेवेची मदार इंदिरा गांधी रुग्णालयावर अवलंबून आहे. परंतु, वैद्यकीय सेवा पुरविण्याऐवजी रुग्णालय वादाचेच केंद्र बनले आहे.

पालिका काळापासून पंचवटीत इंदिरा गांधी रुग्णालय होते. डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना त्यांनी रुग्णालय विस्तारीकरणाच्या कामाला गती देऊन बाह्यरुग्ण विभागासह अन्य सुविधा पुरविल्या. २००३ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात रुग्णालयाच्या खाटांची संख्या पन्नास करण्यात आली. पंचवटीकरांसाठी रुग्णालय वरदान ठरेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रारंभापासूनच रुग्णालयाचा कारभार वादात सापडला. वैद्यकीय सुविधा केंद्राऐवजी वादाचे केंद्र म्हणूनच रुग्णालयाकडे पाहिले जाते. रुग्णालयात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. 

डॉक्‍टर वेळेवर तर येत नाहीच, अन्य कर्मचारीही वेळेत पोचत नसल्याने रुग्णालयाच्या वेळेबाबत संभ्रम आहे. लिफ्ट बंद पडणे, चुकीचे उपचार करणे, औषधांचा तुटवडा, शौचालयांची दुरवस्था या नेहमीच्या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाने कधीही लक्ष दिले नाही.

इन्क्‍युबेटरचा अभाव
महापालिकेच्या इतर रुग्णालयांप्रमाणेच इंदिरा गांधी रुग्णालयातही इन्क्‍युबेटरची व्यवस्था नाही. कमी दिवसांच्या बालकांसाठी येथे सोय नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, तेथेही ही संख्या अतिशय मर्यादित असल्याने गरीब रुग्णांसमोर खासगी रुग्णालयात जाण्याचाच पर्याय शिल्लक राहतो. तो खर्चिक असल्याने अनेकांना परवडणारा नसतो, पर्यायाने अनेक बालके उपचारांदरम्यान दगावतात.

रुग्णालयात आवश्‍यक बाबी
सायंकाळीही बाह्यरुग्ण विभाग बंद
कर्मचाऱ्यांची हजेरी अनियमित
शस्त्रक्रिया विभाग अद्ययावत नाही
सोनोग्राफी मशिन असूनही वापर नाही
स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता
स्त्री व पुरुष रुग्ण तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही
रुग्णालयात सीसीटीव्ही नाही

नाशिक रोडच्या बिटको हॉस्पिटलच्या धर्तीवर पंचवटीतील गरीब रुग्णांसाठी मोठे व सुसज्ज हॉस्पिटल सुरू करावे. इंदिरा गांधी रुग्णालयातही गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावेत. 
- जगदीश पाटील, नगरसेवक 

पंचवटीत झोपडपट्टी परिसर असून, त्या तुलनेत आरोग्याच्या सुविधा कमी आहेत. इंदिरा गांधी रुग्णालयाप्रमाणेच मायको दवाखान्यात दोनवेळेस बाह्यरुग्ण विभाग सुरू करावा.
- शांता हिरे, नगरसेविका

Web Title: nashik news hospital medical service