मंगेशकर अन्‌ झेंडेंचा नागरी सन्मान

मंगेशकर अन्‌ झेंडेंचा नागरी सन्मान

नाशिक - पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरावटींनी आजच्या रम्य सायंकाळी नाशिककरांनी साजरी केली देव दिवाळी! निमित्त होते, रसिकांच्या मनात शब्द, सूर, गीत व संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आणि नाशिकचा चालताबोलता इतिहास, अशी ओळख निर्माण करणारे मधुकरअण्णा झेंडे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या नागरी सन्मानाचे!

कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल आणि बाबाज्‌ थिएटरतर्फे कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पं. शंकरराव वैरागकर होते. त्यांनी पं. मंगेशकरांचा अन्‌ पं. मंगेशकरांनी मधुकरअण्णांचा सन्मान केला. 

भारती मंगेशकर, स्नुषा कृष्णा, आमदार प्रा. देवयानी फरांदे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, माजी उपनगराध्यक्ष वसंतराव भोसले, जयप्रकाश जातेगावकर, श्रीकांत बेणी, शशांक मणेरीकर, सुनील चोपडा, प्रशांत जुन्नरे आदी उपस्थित होते. या वेळी मधुकरअण्णांनी बाळासाहेबांच्या आठवणींचे पुस्तक लिहिणार असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

कुसुमाग्रज अन्‌ गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी यांच्या भेटीमधील अवर्णनीय चर्चेचा साक्षीदार इथंपासून ते भारतीताईंच्या त्यागापर्यंतच्या विविध गोष्टी मधुकरअण्णांनी नाशिककरांना सांगितल्या. तत्कालीन नाशिक पालिकेच्या शतकी वाटचालीबद्दलचा संदर्भग्रंथ तात्यासाहेब आणि सदगुणे यांनी लिहिला. पण त्याचा फायदा मला झाल्याचे मधुकरअण्णांनी आवर्जून सांगितले. बाळासाहेबांनी प्रतिभेला दिलेल्या प्रोत्साहनापासून ते त्यांच्या धाडसी वृत्तीचे दाखले देत मधुकरअण्णांना अवलिया संगीतकाराची सेवा घडावी म्हणून केलेले कार्यक्रम इथंपर्यंतची माहिती त्यांनी दिली. सूरपंढरीतील विठुरायाच्या दर्शनाची तृष्णा आजच्या सोहळ्याने पूर्ण झाल्याचे गौरवोद्‌गार श्री. वैरागकर यांनी काढले. तात्यासाहेबांच्या आठवणी ॲड. लोणारी यांनी सांगितल्या. मैत्री आणि नाते कसे जपावे, हे हृदयनाथांनी शिकविल्याचे स्पष्ट करत श्री. जातेगावकर यांनी नाशिकचा इतिहास मधुकरअण्णांनी लिहावा. त्यासाठी सार्वजनिक वाचनालय मदत करेल, अशी ग्वाही दिली. प्रा. फरांदे, श्री. मणेरीकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, श्री. जुन्नरे यांची भाषणे झाली. 

‘मी खूप आनंदात आहे’
भद्रकालीत मी आणि मधू झेंडे राहिलोय. मधू भाकरी आणि तिखट भाजी द्यायचे. ते अबोल असले, तरीही खूप काम करायचे, या आठवणीला उजाळा देत हृदयनाथांनी आपण खूप आनंदात आहोत, असा भाव उपस्थितांपुढे ठेवला. प्रतिभेच्या संचारातून सुरेश भट यांनी ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...’ हे गीत दोन मिनिटांत लिहिले आणि ते अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या हातावर ठेवले, पण मी गाणे विकू शकत नाही, असे म्हणत ते टॅक्‍सीमधून निघून गेले, ही आठवण सांगून हृदयनाथांनी दोन दिवसांच्या कार्यशाळेचे पैसे बाबाज्‌ थिएटरला देणगी म्हणून देत असल्याचे सांगताच प्रशांत जुन्नरे यांनी उठून त्यांना नमस्कार केला. हृदयनाथांनी ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या...’, तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे ‘समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा’ हे काव्य आपल्या सुरेल स्वरांत उपस्थितांमध्ये ठेवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com