दारणा धरण भागात वडाच्या झाडांची कत्तल

दारणा धरण भागात वडाच्या झाडांची कत्तल

इगतपुरी - ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दीडशे वर्षांपूर्वी लावलेल्या अस्वली स्टेशन ते दारणा धरण मार्गावरील रस्त्यावरील अनेक  वडाच्या झाडांची दिवसाढवळ्या तोड सुरू असून, वन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जुन्या वृक्षांची तोड होत असूनही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे. या प्रकरणी वन अधिकारी दाद देत नसल्याने न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे वृक्षप्रेमींनी ठरविले आहे.

लेकबिल फाटा-अस्वली स्टेशन-नांदगाव बुद्रुक रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वडांच्या झाडांचा रहदारीला अडथळा नाही. झाडे तोडताना न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचा संबंधितांना सोयीस्कर विसर पडला आहे. या भागातील वन विभागाचे अधिकारी देशपांडे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी झाडे तोडणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालत बातमी प्रकाशित करू नये, म्हणून आग्रह धरला. संबंधित झाडे तोडणाऱ्याकडे पूर्वपरवानगी नसून केवळ झाडांच्या फांद्या छाटणी करण्याबाबत त्यांनी इगतपुरी वन विभागाच्या कार्यालयात अर्ज दिला असल्याचे समजते. झाडे तोडण्याबाबत परवानगी नसताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. 

जुन्या उपयुक्त झाडांची बेसुमार कत्तल करणाऱ्या सर्वांवर वन कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे. अधिकाऱ्यांनी गुन्हे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई न केल्यास न्यायालयीन आदेशाचा अवमान केला, म्हणून खटला दाखल करण्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले.

जुन्या वडांच्या झाडांची तोड करण्यास परवानगी दिलेली नाही. तथापि, असे काही घडत असेल, तर याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
-आर. पी. ढोमसे, वन परिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी

न्यायालयाच्या मार्गदर्शक आदेशाला हरताळ फासून सर्रास वडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. दिवसाढवळ्या असे प्रकार अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच होणे शक्‍य आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास याचिका दाखल करू.
-कैलास कडू, वृक्षप्रेमी, इगतपुरी

फांद्या तोडण्याची परवानगी असू शकते. मात्र, झाड चुकून तोडले असेल, तर दुर्लक्ष करा. माझ्याकडे अनेक चार्ज असल्याने मला काही लक्ष देता आले नाही. 
-ओ. ए. देशपांडे, वनपाल

वन अधिकारी फिरकत नाहीत 
या भागात वन अधिकारी कधीच फिरकत नाहीत. मोठ्या प्रमाणावरील विविध जातींची दुर्मिळ झाडे आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बऱ्याच झाडांची बेकायदा कत्तल झाली आहे. वनसंपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच भक्षक बनल्याने आक्रमक भूमिका घ्यावी लागणार असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com