औद्योगिक वसाहतीचे कोंदण लाभलेला शिवार सुविधांपासून कोसो दूर

महेंद्र महाजन
गुरुवार, 1 जून 2017

औद्योगिक वसाहतीचे कोंदण लाभलेले, शेतकऱ्यांसह कामगारांच्या लोकवस्तीच्या सातपूर शिवाराची अजूनही पायाभूत सुविधांची प्रतीक्षा संपलेली नाही. सातपूरच्या शिवेलगत असलेल्या पिंपळगाव बहुलाकरांची अवस्था ‘खेडं हे खेडं राहिलं’, अशी झालीय. दोन्ही शिवारांतील शेतकरी पीककर्ज माफीच्या अनुषंगाने सरकारकडून होत नसलेल्या निर्णयामुळे संतापलेत. वाढत्या शहरीकरणात विस्तारित भागाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालेल्या चुंचाळे शिवारातील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रश्‍न सुटणार नसतील, तर त्याबद्दल किती बोलायचे?, अशी भावना तयार झालीय. गावकूस बदलून विकासाचा कवडसा दिसावा, अशी लागलेली आस अद्याप  कायम आहे...

औद्योगिक वसाहतीचे कोंदण लाभलेले, शेतकऱ्यांसह कामगारांच्या लोकवस्तीच्या सातपूर शिवाराची अजूनही पायाभूत सुविधांची प्रतीक्षा संपलेली नाही. सातपूरच्या शिवेलगत असलेल्या पिंपळगाव बहुलाकरांची अवस्था ‘खेडं हे खेडं राहिलं’, अशी झालीय. दोन्ही शिवारांतील शेतकरी पीककर्ज माफीच्या अनुषंगाने सरकारकडून होत नसलेल्या निर्णयामुळे संतापलेत. वाढत्या शहरीकरणात विस्तारित भागाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालेल्या चुंचाळे शिवारातील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रश्‍न सुटणार नसतील, तर त्याबद्दल किती बोलायचे?, अशी भावना तयार झालीय. गावकूस बदलून विकासाचा कवडसा दिसावा, अशी लागलेली आस अद्याप  कायम आहे...

सातपूर शिवारातील ५८ कुटुंबांचे ३६३ हेक्‍टर क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी संपादित झाले आहे. त्या बदल्यात मोबदला तोकडा देण्यात आल्याची भावना स्थानिकांत आहे. उद्योगांच्या जमिनींच्या बदल्यात भूखंड देण्याची तयारी औद्योगिक विकास महामंडळाने दर्शविली होती. मात्र, ही प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. नोकरीचा मुद्दाही अनुत्तरित आहे. ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार पूर्वी शेतीला प्राधान्य दिल्याने आणि आता शेती अडचणीत आल्याने नोकरी करण्याखेरीज गत्यंतर राहिलेले नाही. सातपूर ग्रामपंचायत असताना गोविंद तात्याबा निगळ, मोतीराम बोरू घाटोळ, गंगूबाई पुंडलिक काठे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. नंतर पालिकेचे नगराध्यक्ष, उद्योगनगरीचे जनक (कै.) बाबूशेठ राठी होते. डॉ. झुंबर सीताराम भंदुरे यांनीही नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. पुढे सातपूर नगर परिषद झाल्यावर रामचंद्रनाना पाटील निगळ नगराध्यक्ष होते. त्या वेळी साडेतीन हजारांच्या आसपास लोकसंख्या होती. महापालिकेत सातपूरचा समावेश झाल्यावर रामचंद्रनाना पाटील निगळ नगरसेवक होते. नंतर कमलताई विधाते, सुरेश भंदुरे, सुवर्णा तुकाराम मोराडे, सचिन भोर यांनी नगरसेवक म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व केले. आता सीमा गोकुळ निगळ नगरसेविका आहेत.

भोकरी, अनामशाही द्राक्षाचे उत्पादन सातपूरच्या शेतकऱ्यांनी घेतले. चमेली टोमॅटो, भात, भाजीपाला, कारली, भोपळे, रब्बीत ज्वारी, गव्हाचे उत्पादन घेतले जायचे. काही शेतकऱ्यांच्या पेरूच्या बागा होत्या. फुलांची शेती केली जायची. भद्रकाली, महात्मा फुले मार्केट, गंगाघाट याठिकाणी शेतकरी भाजीपाल्याची विक्री करायचे. गावठाणमध्ये निगळ गल्ली, घाटोळ गल्ली, भंदुरे गल्ली, विधाते गल्ली, मौले गल्ली, सोनवणे गल्ली, माळीवाडा, कोळीवाडा, राजवाडासह कांबळेवाडी, स्वारबाबानगर, महादेववाडी, वडारवाडी, सातपूर कॉलनी या परिसराचा समावेश आहे. निगळ, घाटोळ, बंदावणे, भंदुरे, विधाते, सोनवणे, काठे, तिडके, मौले, काश्‍मिरे, आहेर, पुराणे, काळे, वागळे, बेंडकोळी, अस्वले, पारधी, पवार, गोतरणे, गुंजाळ, पवार, कणसे, शेख, मुंदडा, लाहोटी कुटुंबीयांचे सातपूर अशी ओळख आहे. कमी दाबाने पाणी ही समस्या बहुतांश सातपूरकरांची आहे. कांबळेवाडी, संतोषीमातानगरमध्ये शाळेची आवश्‍यकता असून, प्रबुद्धनगरमध्ये आणखी एका शाळेची आवश्‍यकता आहे. स्थानिकांकडून महादेववाडीमधील शाळेची अवकळा दूर करावी, असा आग्रह धरला जात आहे. स्वारबाबानगरमध्ये स्मशानभूमी असून, तिचा उपयोग सातपूर कॉलनी, श्रमिकनगर, अशोकनगर भागासाठी केला जातो. स्मशानभूमीमधील सुविधांमध्ये वाढ करायला हवी आणि नंदिनी नदीजवळ दशक्रियेसाठी शेड बांधावी, अशी मागणी पुढे आली आहे. आता जवळपास ५०० एकरावर शेती केली जाते. त्यात द्राक्षे, भाजीपाला, ऊस, पुदिनाचे उत्पादन घेतले जात असले, तरी शेतकऱ्यांत अल्पभूधारक असल्याची खंत आहे.

दारूबंदीची यशस्वी चळवळ
कोळीवाड्यातील भगिनींनी दारूबंदीची चळवळ फत्ते केली होती. चळवळीमुळे दारूचे दुकान टाकण्याचे धाडस अद्याप कुणीही केलेले नाही. पिंपळगाव बहुला गावात विकास सोसायटीची स्थापना १९२१ मध्ये झाली. १९६५ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाली. रखमाजीदादा नागरे, रामजी आप्पाजी नागरे, कारभारी पाटील नागरे, लहानूदादा भावले यांनी सरपंच म्हणून नेतृत्व केले. महापालिकेत गावाचा समावेश झाला असताना कारभारी नागरे सरपंच होते. नागरे, भावले, घुगे, धामणे, गुंबाडे, तिवडे, काकड, बोडके, धात्रक, खोंडे अशा कुटुंबांच्या गावांची वस्ती पूर्वी जलशुद्धीकरण केंद्राच्या भागातील पांढरीत होती. पिंपळगाव भावले असे ओळख असलेले गाव आताच्या त्र्यंबकेश्‍वर रस्त्यालगत वसले. ते पिंपळगाव बहुला या नावाने ओळखले जाऊ लागले. चार हजार एकरावर शेती कसली जात होती. इथल्या शेतकऱ्यांनी बेलगाव ढगा, तिरडशेत, सातपूर शिवारात शेती घेतली आहे. पूर्वी वांगी, टोमॅटो, भेंडी, वाटाण्याचे उत्पादन घेतले जायचे. मोटेने पाणी देण्यात येत होते. डिझेल इंजिन आल्यावर विहिरींची संख्या वाढली. बाजरी, बटाट्याचे उत्पादन घ्यायला लागले. वीज आणि पंप, पाइप आल्यावर फ्लॉवर, कोबीचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली आणि मुंबईत भाजीपाला विकला जाऊ लागला. पुढे सिमला मिरचीचे उत्पादन घेतले जाऊ लागले. १९७७ नंतर कोकणी, घुगे, थेटे कुटुंबांची द्राक्षशेती फुलली. १९८० पासून भाजीपाल्याचे क्षेत्र वाढले. आता ४०० एकरावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. मधल्या काळात उसाची लागवड केली  जात होती. 

महापालिकेत गावाचा समावेश झाल्यावर माहेर असलेल्या लता दिनकर पाटील यांनी नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले. रेखा नंदूशेठ जाधव, बबाताई नागरे, राजेंद्र नागरे, सुरेखा गोकुळ नागरे यांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिले. आता सुदामदादा नागरे नगरसेवक आहेत. अशोकनगर, श्रमिकनगर, राधाकृष्णनगर, जाधव संकुल, विश्‍वासनगर, संभाजीनगर, स्वामी विवेकानंदनगर, वास्तुनगर, समृद्धनगर, सात माउली चौक इतका विस्तार शिवाराचा झाला असून, लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे पोचली आहे. मळ्यांमधील लोकसंख्या तीन हजार ८०० पर्यंत आहे.

सातपूर प्रभाग सभापती म्हणून संधी मिळाली आहे. आता विभागातील समस्या जाणून घेत आहे. स्थानिक विविध मागण्या करीत आहेत. प्रत्येक गोष्टीची नोंद घेत त्याचा पाठपुरावा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्व नगरसेवकांचे सहकार्य घेणार आहोत. स्थानिकांच्या दैनंदिन गरजांचे प्रश्‍न सोडविताना नवीन तयार झालेल्या प्रश्‍नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील.
- माधुरी गणेश बोलकर, सभापती, सातपूर प्रभाग

अंतर्गत रस्त्यांच्या जोडीलाच पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागायला हवा. औद्योगिक वसाहतीत मलनिस्सारणाची व्यवस्था करून गोदावरीच्या स्वच्छतेचा प्रश्‍न निकाली काढणे शक्‍य आहे. त्र्यंबकेश्‍वर रोड ते बारदान फाटा, कार्बन कंपनी ते कामगारनगर रस्त्यांचे रुंदीकरण करून दुभाजक टाकणे आवश्‍यक आहे. सातपूरला क्रीडांगण व्हावे. महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी. पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जलकुंभाच्या जोडीलाच नवीन जलवाहिन्या टाकायला हव्यात. 
- दिनकर पाटील, नगरसेवक

सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्राशी निगडित वस्तीचा शहराच्या विकासात मोठा वाटा आहे. त्यामुळे हा भाग कॉर्पोरेट विश्‍व म्हणून विकसित होणे आवश्‍यक आहे. बकाल वस्त्यांचे रूपडे पालटणे आवश्‍यक आहे. गंगापूर आणि कॉलेज रोडच्या जोडीला या भागात बाजारपेठ उभी राहणे आवश्‍यक आहे. स्मार्टसिटीचा विचार करता सातपूर ते त्र्यंबकेश्‍वर रोड, सातपूर ते अंबड लिंक रोड, अंबड ते पाथर्डी रोड, अशोकनगरचा मुख्य रस्ता हा भाग डोळ्यापुढे ठेवून विकासाची कामे करण्याची गरज आहे.
- सचिन भोर, माजी नगरसेवक

सरपंचांची दूरदृष्टी
सातपूर, अंबड, चुंचाळे, कामटवाडे, पिंपळगाव बहुला, तिरडशेत असा पूर्वी महसूलचा सज्जा होता. सज्जाचे तलाठी पूर्वी सातपूरमध्ये असायचे. ग्रुप ग्रामपंचायतीत चुंचाळेचा समावेश होता. मेदगे, भोर, आदिवासी आणि दलित बांधवांची वस्ती होती. ग्रामपंचायत झाल्यावर कमळाबाई नारायण मेदगे सरपंच झाल्या. त्यांच्या दूरदृष्टिकोनातून गायरानात जागा मिळाली. त्यात वस्ती वाढली. पुढे पाच एकर क्षेत्रात वस्ती वसली आणि वरचे चुंचाळे म्हणून त्याची ओळख झाली.

Web Title: nashik news Industrial Colony