‘जलयुक्त’साठी अनुदानाचा विचार

‘जलयुक्त’साठी अनुदानाचा विचार

नाशिक - जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य झाले आहे. यापुढे जलयुक्‍त गावात त्यांची यंत्रणा कायमस्वरूपी चालविण्यासाठी दर वर्षी अनुदानाच्या रूपात ठराविक निधी देण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी काल येथे केले. 

कृषीथॉन प्रदर्शनात जलयुक्त शिवार योजना यशस्वी झालेल्या गावांचा व संस्थांचा सत्कार श्री. डवले यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की जलयुक्तची फलश्रुती आता राज्यात दिसू लागली आहे. जलयुक्त झालेल्या गावांना आता पुढे काय करायचे?, हा मोठा प्रश्‍न होता. मात्र, गावातील पाणीपुरवठा यंत्रणा सदैव सुरळीत ठेवण्यासाठी त्यांना शासनातर्फे ठराविक अनुदान देण्याचा विचार आहे. त्यामुळे देखभालीच्या खर्चाची चिंता त्यांना राहणार नाही. या वेळी विभागीय आयुक्‍त महेश झगडे, प्रा. प्रदीप पुरंदरे, दारफळ उस्मानाबादचे लोकराज्य ग्रामचे मुख्य प्रवर्तक आदित्य गोरे, धुळ्याचे कृषी अधीक्षक प्रकाश सांगळे यांची भाषणे झाली. संयोजक संजय न्याहारकर यांनी स्वागत केले. ३६ गावे व संस्थांचा सत्कार करण्यात आला.  

शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर क्षेत्रांत प्रगती करतानाच शेतीशी असलेले आपले नाते कायम ठेवावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांनी येथे केले. कृषी अभियांत्रिकी कृषी जैवतंत्रज्ञान, तंत्र विद्यालय, उद्यानविद्या, विद्यापीठ अभ्यासक्रमात अव्वल ठरलेल्या ३६ विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते. कृषी विभागाचे माजी आयुक्त पांडुरंग वाठरकर, प्रादेशिक कृषीविस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे सुनील वानखेडे, प्रा. किरण यादव  उपस्थित होते. 

संशोधकांचा परिसंवाद 
दुपारच्या सत्रात संशोधकांचा ‘ग्रो सेफ ग्रो स्मार्ट’ हा परिसंवाद झाला. त्यात द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, खंडूअण्णा शेवाळे, वासुदेव काठे, डॉ. सतीश भोंडे, मधुकर क्षीरसागर, राजाराम सांगळे, मारुती चव्हाण, सुरेश खोडे, विश्‍वास कराडे, कीडतज्ज्ञ तुषार उगले, कैलास भोसले, माणिकराव पाटील, अभिजित झांबरे सहभागी झाले होते. प्रदर्शनाचा समारोप आज(ता. २७) सायंकाळी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com