जनस्थान फेस्टिव्हलची तीन दिवस धूम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पं. दसककर, विद्या देशपांडे, करंजीकर यांना जनस्थान आयकॉन; प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर पुरस्कार

पं. दसककर, विद्या देशपांडे, करंजीकर यांना जनस्थान आयकॉन; प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर पुरस्कार

नाशिक - येथील जनस्थान व्हॉट्‌सॲप ग्रुपतर्फे तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त २२ ते २४ जूनदरम्यान सांस्कृतिक, पुरस्कार वितरण व चित्रशिल्प प्रदर्शन आदी कार्यक्रम होणार आहेत. या जनस्थान फेस्टिव्हलअंतर्गत प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर जनस्थान आयकॉन पुरस्कार दिला जाईल. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा महोत्सव होईल.
अभय ओझरकर म्हणाले, की जनस्थान ग्रुपमधील सदस्य तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे नुकतेच निधन झाले. तबला या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनोखे असून, त्यालाच मानवंदना म्हणून पहिल्या दिवसाचा कार्यक्रम ‘समर्पण’ या नावाने त्यांना अर्पण केला आहे. या वेळी डॉ. मो. स. गोसावी यांच्या उपस्थितीत त्यांना मरणोत्तर ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार प्रदान केला जाईल. संभव चित्रशिल्प प्रदर्शन होणार आहे. त्याचे उद्‌घाटन सायंकाळी सहाला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते होईल.

‘समर्पण’अंतर्गत नितीन पवार, नितीन वारे, सतीश पेंडसे, सुजित काळे, दिगंबर सोनवणे व वैष्णवी भडकमकर हे तबलावादक सहभागी होतील.
२३ जूनला पारंपरिक नांदीने सुरवात झाल्यानंतर आशिष रानडे, ज्ञानेश्‍वर कासार, आनंद अत्रे, रागिणी कामतीकर, विद्या कुलकर्णी, गीता माळी, प्रांजली बिरारी, नवीन तांबट, सतीश पेंडसे, दिगंबर सोनवणे आदी कलावंत सहभागी होतील. ‘सन्मान‘अंतर्गत जनस्थान आयकॉन पुरस्कार प्रदान केले जातील. पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना यंदाचा जनस्थान आयकॉन पुरस्कार जाहीर झाला आहे. सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होईल. या वेळी महापौर रंजना भानसी उपस्थित राहतील. 

२४ जूनला ‘सृजन’ हा नृत्याचा कार्यक्रम होईल. यात विद्या देशपांडे, सुमुखी अथनी आणि कीर्ती भवाळकर या कथक आविष्कार प्रस्तुत करतील. मोहन उपासनी, आशिष रानडे, नितीन पवार आदी साथसंगत करतील. चित्रशिल्पांमध्ये राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, नंदू गवांदे, सी. एल. कुलकर्णी, अनिल माळी, प्रसाद पवार, केशव कासार, संदीप लोंढे, यतिन पंडित, श्‍याम लोंढे, स्नेहल एकबोटे, शीतल सोनवणे, श्रेयस गर्गे 
आदींची चित्रशिल्पे मांडण्यात येणार आहेत. 

या कार्यक्रमासाठी धनंजय बेळे, अरुण नेवासकर, समीर शेटे, विश्‍वास ठाकूर, अमृता पवार, मिलिंद जहागीरदार यांचे सहकार्य लाभले आहे. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जनस्थान ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर, विनोद राठोड व स्वानंद बेदरकर यांनी केले.

Web Title: nashik news jansthan festival